News Flash

ठाणे जिल्ह्यासाठी पाच नवी करोना चाचणी केंद्र – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

अहवालासाठी मुंबईवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्यासाठी ५ नव्या करोना चाचणी केंद्राची घोषणा केली आहे. बदलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ही घोषणा केली. बदलापूर, अंबरनाथ-उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण अशा ५ विभागांसाठी नवी चाचणी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना अहवालासाठी मुंबईतील चाचणी केंद्र आणि लॅबवर अवलंबून रहावं लागत होतं. मात्र ठाणे जिल्ह्यातील नवीन चाचणी केंद्रामुळे आता अहवाल जलद प्राप्त होणार आहेत.

बदलापूर दौऱ्यावर आलेल्या राजेश टोपेंनी शहरातील आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात एका बाधित रुग्णामागे संपर्कात आलेल्या ६ व्यक्तींचच ट्रेसिंग होत असल्याबद्दल टोपे यांनी नाराजी व्यक्त केली. एका व्यक्तीशी संपर्कात आलेल्या किमान १५ जणांचं ट्रेसिंग होणं अपेक्षित असल्याचं टोपे यांनी सांगितलं. याचवेळी दोन्ही शहरातील कोविड सेंटरमधील खाटांची क्षमता तातडीने वाढवण्याची गरज असल्याचंही टोपे म्हणाले.

तब्बल दोन तास अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना केल्या. रुग्णांची हेळसांड होत असल्यास खासगी रुग्ण वाहिका ताब्यात घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. याचसोबत गरज असेल तिकडे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्लाही टोपेंनी दिला. या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार, पालिकांचे मुख्याधिकारी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा – धक्कादायक ! बदलापुरात एकाच दिवशी ५१ जणांना करोनाची लागण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:10 pm

Web Title: 5 new covid 19 testing centers for thane district state health minister rajesh tope makes announcement in badlapur psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक ! बदलापुरात एकाच दिवशी ५१ जणांना करोनाची लागण
2 ठाणे : आमदार गीता जैन, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांना करोनाची लागण
3 कल्याण डोंबिवलीत करोनाचा कहर, ५६० नवे रुग्ण
Just Now!
X