23 October 2020

News Flash

ठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद

खर्च पाण्यात गेल्याची नगरसेवकांची खंत

खर्च पाण्यात गेल्याची नगरसेवकांची खंत

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या १३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ५० टक्के कॅमेरे बंद असल्याचा दावा करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकल्पाचा खर्च पाण्यात गेल्याची खंत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.

ठाणे महापालिका प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे शहरातील विविध रस्त्यांवर  बसविण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविण्यात आले होते. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. मात्र शहरातील ५० टक्के कॅमेरे बंद असल्याचा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सर्वसाधारण सभेत केला आहे. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन देत हा मुद्दा उचलून धरला. कॅमेरे बसविण्यासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु हे कॅमेरे बंद पडल्याने त्याचा खर्च पाण्यात गेल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली.

चौकशी समिती नेमण्याची मागणी

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात वायफाय योजना उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून उत्पन्नापैकी काही हिस्सा महापालिकेला देण्याचा करार केला आहे. परंतु हा महसूल अजूनही पालिकेला प्राप्त झाला नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. या उपक्रमात पाचशे केबीपीएसपर्यंत मोफत वायफाय सुविधा देण्याचे आणि त्यावरील वापराकरिता ठेकेदाराने पैसे आकारावेत, असे ठरले होते. त्यानुसार ठेकेदाराकडून वर्षांकाठी ६२ लाख रुपये महसूल येणे अपेक्षित होते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र खात्यात केवळ तीन हजार रुपये ठेकेदाराने जमा केले आहेत, अशी माहिती उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी दिली. यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. या योजनेतील त्रुटींचा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले.

या उपक्रमासाठी स्वतंत्र बँक खाते तयार करण्यात आले होते. त्या खात्यातून ठरल्याप्रमाणे उत्पन्नाचा हिस्सा महापालिका आणि कंपनीच्या खात्यात जमा होतो. महापालिकेने आमच्याकडून काही अतिरिक्त सुविधा घेतल्या असून त्याचे पैसे मिळणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

– अमोल नलावडे, संचालक, इनटेक ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:45 am

Web Title: 50 percent cctv in thane closed zws 70
Next Stories
1 Coronavirus : करोनाचा कहर सुरूच
2 माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
3 ठाणे महापालिकेच्या शाळा बंदच
Just Now!
X