खरीप हंगाम : आठवडय़ाभरात १०० टक्के लागवड

ठाणे : जिल्ह्यात पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांची लागवड वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली असून आठवडाभरात १०० टक्के लागवड होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.

जिल्ह्यामधील एकूण ५९ हजार ९१०.६४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २९ हजार ३९६ हेक्टर खरीप क्षेत्रात लागवड पूर्ण झाली आहे. प्रमुख पीक असलेल्या भात शेतीच्या एकूण ५४ हजार ९५१.३८ हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये एकीकडे करोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे प्रशासन या कामामध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यतील सर्वच ठिकाणी मार्च महिन्यापासून कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी या टाळेबंदीचा जिल्ह्यतील खरीप लागवडीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मे महिन्यापासून खरीप नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर खत आणि बियाणे मिळण्याकरता उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यासोबतच करोना टाळेबंदीच्या काळात कृषी लागवडीसाठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करण्याला परवानगी द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करून बियाणे आणि खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.

यंदा जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीच्या लागवडीसाठी ५४ हजार ९५१.३८ एवढय़ा हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे लक्ष ठेवले होते. यासोबतच नाचणी, वरई, डाळी, भुईमूग अशा विविध खरीप पिकांचे ४ हजार ९४८.२६ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे लक्ष ठेवले होते. त्यामुळे यंदा जिल्ह्यात एकूण ५९ हजार ९१०.६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. असे असले तरी जून महिन्याच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढे काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र २० जूननंतर जिल्ह्यतील ग्रामीण भागांमध्ये पावसाने बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली.

सध्या जिल्ह्यामध्ये १०० टक्के खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दमदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्यामुळे  शेतकऱ्यांनी लागवडीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे १५ जुलैपर्यंत जिल्ह्यतील भात पिकांसह नाचणी, डाळी, वरई, भुईमूगाची ५० टक्के लागवड पूर्ण झाली आहे. तर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे येत्या आठवडय़ाभरात खरीप पिकांची १०० टक्के लागवड पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना-२०२० खरीप हंगामातील भात आणि नाचणी या पिकासाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून या जिल्ह्यतील टाळेबंदीच्या काळातही शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच जन सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात आणि नाचणी या पिकांची जोखीम कमी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे.

– अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे