22 January 2021

News Flash

जिल्ह्याची जलचिंता दूर

धरण भरल्याने वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत

महिनाभरात बारवीमध्ये ५० टक्के पाण्याची भर; धरण भरल्याने वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील बारवी धरण सोमवारी पहाटेपासून भरून वाहू लागले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिनाभर उशिराने धरण भरले असले तरी धरण भरल्यामुळे जिल्ह्य़ाची जलचिंता आता मिटली आहे. विशेष म्हणजे, बारवी धरणामध्ये जुलै महिनाअखेरीस अवघा ४८ टक्के पाणीसाठा होता. तर, उर्वरित ५२ टक्केपाणीसाठा ऑगस्ट महिन्यात जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील नागरिकांना जलदिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण आहे. या धरणातून जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण एकूण ३४० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमतेचे आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस बारावीसह जिल्ह्य़ातील इतर धरण भरून वाहू लागतात. यंदा मे महिन्याच्या अखेरीस आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर जून महिना कोरडाच गेला. जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक नव्हते. त्यामुळे धरणातील पाणी साठय़ात पुरेशी वाढ झाली नव्हती. तसेच मुंबई आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणी पातळी खालावल्याने मुंबई महापालिकेने २० टक्केपाणीकपात लागू केली होती. तसेच जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मिरा भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही निम्मेच भरले होते. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत बारवी धरणात अवघा ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या पालिकांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत होती, परंतु ऑगस्ट महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात उर्वरित ५२ टक्के पाणीसाठा महिनाभरात जमा झाला असून हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सोमवार पहाटे पाच वाजल्यापासून धरणाचे ७ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. त्यातून ५४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली. गेल्या वर्षांत जुलै महिन्याच्या अखेरीस भरणारे धरण यंदा एक महिना उशिराने भरले आहे. त्यामुळे उशिराने का होईना जिल्ह्य़ाची पाणी चिंता दूर झाली आहे.

धरणात जास्त जलसंचय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा गेल्या वर्षांत पूर्ण करण्यात आला. यातील काही धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असला तरी बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढून त्यामध्ये अतिरिक्त १०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात यश आले आहे. यापूर्वी २३५ दशलक्ष घनमीटर  पाणीसाठा धरणात करता येत होता. आता ही क्षमता ३४० दशलक्ष घनमीटपर्यंत वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:37 am

Web Title: 50 percent water increased in barvi dam in a month due to rainfall zws 70
Next Stories
1 १८ गावे बेवारस!
2 टाळेबंदी शिथिल तरी हवा शुद्ध
3 ठाणे ग्रामीणमध्येही शीघ्र प्रतिजन चाचण्या
Just Now!
X