टाळेबंदीच्या काळात आर्थिक नुकसान झाल्याचा परिणाम

भगवान मंडलिक, प्रतिनिधी

डोंबिवली : टाळेबंदीच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने आणि पुढील काळातही वाढत्या करोना संसर्गामुळे व्यवसायाला उभारी मिळण्याची शक्यता नसल्याने डोंबिवली परिसरातील २५ टक्के मिठाईची दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली आहेत. या व्यवसायातील बहुतांशी व्यापारी राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश प्रांतामधील आहेत. टाळेबंदीच्या काळात ही व्यापारी मंडळी कुटुंबासह गावाकडे गेली, ती पुन्हा परतलीच नाहीत. डोंबिवलीतील काही मिठाई विक्रेत्यांनी ही माहिती दिली.

डोंबिवली परिसरात मिठाईची एकूण सुमारे १५० ते २०० दुकाने आहेत. बहुतांशी व्यापाऱ्यांचे स्वत:च्या मालकीचे गाळे आहेत. मागील ४० ते ५० वर्षांपासून ते व्यवसाय करीत आहेत. काही दुकानदार भाडय़ाने गाळा घेऊन व्यवसाय करीत होते. मार्चपासून जूनपर्यंत कठोर टाळेबंदी होती. या कालावधीत सर्व व्यवहार ठप्प असल्याने लग्नसराई, सण-उत्सवाचे सर्व दिवस टाळेबंदीत गेले. धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे पेढे, मिठाई आणि इतर पदार्थाची विक्री थांबली, असे विक्रेत्यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या काळात दुकान बंद राहिल्याने उत्पन्न पूर्णपणे बुडाले. घरखर्च मात्र नियमित सुरू होता. दरमहा सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे भाडे द्यावे लागते. महावितरणचे ४० ते ५० हजार रुपये आलेले वीज देयक भरणा करणे आवश्यक होते. याशिवाय सोसायटीला मालमत्ता कराचा भरणा करावा लागतो आणि दुकान बंद असले तरी त्याची देखभाल करावी लागते. परंतु उत्पन्न नसल्याने हा सगळा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न भाडय़ाचे गाळे घेणाऱ्या मिठाई दुकान चालकांसमोर होता. उसनवारी, बँक कर्ज घेऊन हा प्रश्न संपणारा नसल्याने टाळेबंदीच्या काळात गावी गेलेला मिठाई दुकानदार पुन्हा डोंबिवलीत परतलाच नाही. अशा प्रकारचे सुमारे ५० ते ६० दुकानदार परतले नाहीत, अशी माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली.

मागील दोन महिन्यांपासून उर्वरित मिठाई दुकाने सुरू असली तरी त्या ठिकाणी पूर्वीसारखे ग्राहक येत नाहीत. तसेच पदार्थ बनविणाऱ्या कामगारांची मजुरी दुप्पट झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उर्वरित मिठाई विक्रेते दुकान बंद करण्याच्या वाटेवर आहेत, असे डोंबिवलीतील आरती स्वीट्स होमचे राधेश्याम कांदू यांनी सांगितले.

टाळेबंदीनंतर मिठाई व्यावसायिकांचा व्यवसाय ३५ टक्क्यांवर आला आहे. लोकल बंद असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वच विक्रेत्यांना बसला आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदी केलेला माल ओझेवाल्यांच्या माध्यमातून ८०० रुपयात रेल्वेने डोंबिवलीत यायचा. आता हा माल खासगी वाहनाने अडीच ते तीन हजार रुपये मोजून आणावा लागतो. कल्याणमधून साहित्य आणायचे असेल तर २०० रुपये खर्च यायचा. आता त्यासाठी ७०० रुपये मोजावे लागतात. हा दामदुप्पट खर्च व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडत आहे.

– श्रीपाद कुळकर्णी, मिठाई विक्रेता, डोंबिवली

भाडय़ाने गाळे घेऊन मिठाई दुकाने चालवितात, त्यांना दुकान चालविणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. यापूर्वी दुकानात दिवसात ३०० ते ४०० ग्राहक यायचे. आता ही संख्या ६० ते ७० वर आली आहे. मालकाला भाडे देणे, वीज देयक भरणा करण्याची जबाबदारी दुकान मालकाची आहे. त्यात कच्चा माल, कारागिरांचा खर्च वाढला आहे.       

– राधेश्याम कांदू,  मिठाई विक्रेता