News Flash

२४ तासांत ५० वृक्ष भुईसपाट

गेला आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत आहेत.

| July 30, 2015 03:19 am

गेला आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये केवळ ठाणे शहरातच पन्नासहून अधिक वृक्ष कोसळल्याचे समोर आले आहे. यापैकी एका घटनेत पाच जण किरकोळ जखमी झाले, तर अन्य काही घटनांत वाहने व मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, एवढय़ा मोठय़ा संख्येने झाडे कोसळू लागल्याने शहरातील वृक्षांच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
गेल्या आठवडय़ाभरापासून सुरू असलेल्या पावसाला मंगळवारी सकाळपासून जोर चढला असून सोबत सोसाटय़ाचे वारेही वाहत आहेत. याचा फटका ठाण्यातील जुन्या वृक्षांना बसला. पालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत शहरात ५० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी सायंकाळी तलावपाळी परिसरात दोन झाडे कोसळून दोन गाडय़ांचे नुकसान झाले. तर बुधवारी सकाळी शांतिनगर भागात तीन झोपडय़ांवर झाड कोसळून पाच जण जखमी झाले. संदीप राऊत, पूजा राऊत आणि यशवंत राऊत अशी यांपैकी तीन जखमींची नावे असून दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.
सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पाऊस यांमुळे वृक्ष कोसळण्याचे प्रकार नियमितपणे होत असले तरी यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जाणकारांच्या मते, पावसाळय़ापूर्वी वृक्षांची योग्य तऱ्हेने छाटणी न झाल्याने ही परिस्थिती ओढवते. ठाणे महापालिकेच्या वृक्ष विभागामार्फत चार वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करण्यात येते. वृक्षांच्या प्रजातीनुसार त्यांची गणना करण्यात येते. तसेच शहरातील मोठय़ा वृक्षांची वेगळी नोंद घेतली जाते. याशिवाय, जुन्या वृक्षांची आयुर्मानानुसारही नोंद करण्यात येते. एखादा वृक्ष मरणावस्थेत आढळला तर त्याची दफ्तरी नोंद करण्यात येते. मात्र, वृक्षांची गणना करताना त्यामध्ये धोकादायक वृक्षांची नोंद घेण्यात येत नाही. पावसाळ्यात असे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण मोठे आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, झाडे कोसळण्याला वाढते सिमेंट-काँक्रीटीकरणदेखील जबाबदार असल्याचे महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी झाडांभोवती सिमेंट-काँक्रीटीकरण झाल्याने झाडांना पसरण्यास वाव उरलेला नाही. त्यामुळे ती कमकुवत होतात व मुसळधार पावसाच्या माऱ्याने कोसळतात, असे माळवी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:19 am

Web Title: 50 tree collapse in 24 hours in thane city
Next Stories
1 कल्याण, डोंबिवलीला ‘क्लस्टर’चे कवच?
2 बेकायदा चिंधी बाजाराला शिवसेनेचा आधार
3 उद्ध्वस्त संसार आणि नातलगांचा आक्रोश!
Just Now!
X