भीमा-कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये बसच्या काचा फोडणे, रास्ता आणि रेल रोको तसेच दगडफेकीसारखे हिंसक प्रकार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी १४ गुन्हे दाखल करून त्यामध्ये ५० आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. याशिवाय, बंदमध्ये हिंसक प्रकार करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची छायाचित्रे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाआधारे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच समाजमाध्यमांवरून अफवा पसरविणारे, तेढ निर्माण करणारे आणि भावना भडकविणारे संदेश पाठविण्यात आल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला असून त्यामध्ये संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

‘महाराष्ट्र बंद’दरम्यान बुधवारी रस्त्यांवर उतरलेल्या बंद समर्थकांनी वाहतूक बंद पाडली तसेच रेल्वे वाहतुकीतही विघ्न आणले. तसेच राज्य परिवहन महामंडळ व महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांचीही मोडतोड करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेकीचेही प्रकार घडले. बुधवारी सायंकाळनंतर संपूर्ण ठाण्यातील व्यवहार सुरळीत झाले. या बंददरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच बेकायदा जमाव जमवून हिंसक प्रकार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून आंदोलनप्रकरणी १४ गुन्हे दाखल करून त्यामध्ये ५० आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. तसेच आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजमाध्यमांवरून अफवा पसरविणारे, तेढ निर्माण करणारे आणि भावना भडकविणारे संदेश पाठविण्याचा सविस्तर तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासामध्ये संबंधित जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमधील विविध पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये २० ते २५ जणांना प्रत्येकी एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यामध्ये काही आरोपींविरोधात नावानिशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.