कल्पेश भोईर

महावितरणकडून २८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

वीज ग्राहकांवर अवाजवी वीज देयके लादणाऱ्या महावितरणकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने ऑक्टोबर महिन्यात २८ हजार वीज देयके थकवणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या थकीत रकमेची वसुली कशी करायची, असा प्रश्न आता महावितरणाला पडलेला आहे.

वसई तालुक्यात एकूण ८ लाख १४ हजार ७१६ वीजजोडण्या आहेत. २५ हजार औद्योगिक, ४० हजार व्यावसायिक जोडण्यांचा यात समावेश आहे. वसई विभागातून तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात २८ हजार २२६ थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामधील ११ हजार ६३४ ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा केल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही थकीत वीज देयकांची वसुली कशी करायची, असा प्रश्न महावितरणाला पडलेला आहे.

एकीकडे वीज थकबाकीदारांच्या रकमा कोटय़वधींच्या घरात जात असून वीजचोरीचे प्रमाण वाढले आहे. घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत आहे.

ज्यांची वीज देयके थकीत आहेत, ते मात्र मोकाट फिरत असून त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यास महावितरण विभाग कुचकामी ठरला आहे. त्यासाठी येथील ग्राहकांना वीज देयक वेळेवर न देता देयकाची तारीख निघून गेल्यावर देण्यात येत असल्याने सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसतो.

वसई, विरार, नालासोपारा, वाडा अशा तीन विभागांत महावितरणाला वीज ग्राहकांकडून उत्पन्न मिळत असते. ऑक्टोबर महिन्यात २१८ कोटींचे उद्दिष्ट असून १७८ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.