एमआयडीसी व एमएसआरडी अंतर्गत नालेसफाईसाठी पालिकेचा ५१ लाखांचा प्रस्ताव

२७ गावांमधील नालेसफाईची कामे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ५१ लाख ८८ हजारांचा प्रस्ताव तयार केला आहे. ज्या नालेसफाईच्या कामासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला आहे ते नाले एमआयडीसी आणि कल्याण शीळ फाटा रस्त्यालगत आहेत. असे असताना एमआयडीसी आणि एमएसआरडीसी नियंत्रक असलेल्या भागातील नाल्यांची सफाई कल्याण डोंबिवली महापालिकेने कशासाठी करायची, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ही एक प्रकारे महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी करीत प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यासाठी पालिकेने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी तयार ठेवला आहे. वर्षांनुवर्षे नालेसफाई म्हणजे पालिका अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदारांची हातसफाई मानली जाते. तसाच प्रकार या वेळी करण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केला आहे. २७ गावांचे नियंत्रक असलेल्या ई प्रभागातील एमआयडीसी आणि शीळ फाटा रस्त्यालगतच्या नाल्यांची सफाई कामासाठी पालिकेने ५१ लाख ८८ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हे सगळे नाले महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतात. असे असताना एमआयडीसी हद्दीतील नालेसफाई करून महापालिकेच्या पैशाचा दौलतजादा कशासाठी करायचा, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविकेने केल्याने खळबळ उडाली आहे. शीळ फाटा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत येतो. या रस्त्याच्या देखभालीसाठी टोल वसूल करण्यात येतो. त्या निधीतून दरवर्षी रस्ते विकास महामंडळ नालेसफाई करते. असे असताना महापालिकेला शीळ फाटा रस्त्यालगतची नालेसफाई करण्याचा पुळका कशासाठी , असा सवालही म्हात्रे यांनी केला आहे. दरम्यान, ‘एमआयडीसी आणि एमएसआरडीसी हद्दीतील नालेसफाईची कामे पालिकेने कशासाठी करायची’ असा प्रश्न  स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनीही उपस्थित केला आहे.

आयुक्तांची दिशाभूल करून पालिकेच्या तिजोरीची उधळपट्टी करणारा प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीनंतर त्याच्यावरील जबाबदारी निश्चित करून त्याला निलंबित करावे.

प्रेमा म्हात्रे, नगरसेविका, शिवसेना</strong>