ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल ५१ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ८५८ वर पोहचली आहे. आतापर्यंत शहरात १५ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने १४२० लोकांना होम क्वारंटाइन केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात पॉजिटीव्ह आढळणारे रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात येत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत ३९६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. बदलापूर शहरातील अनेक व्यक्ती या अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप ४५ जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयासह उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.