प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येने बेकायदा वास्तव्य असल्याचा दावा

वसई : वसई-विरार शहरात नायजेरियन नागरिकांची संख्या वाढत असून त्यांचा विविध गुन्ह्य़ांतील सहभाग उघडकीस येत आहे. शहराच्या विविध भागांत नायजेरियन नागरिकांच्या वसाहती तयार होत आहेत. शहरात हजारोंच्या संख्येने हे नागरिक राहात असताना पोलिसांच्या दप्तरी केवळ ५३ जणांचीच नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसई-विरार परिसरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. गेली काही वर्षे या नागरिकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक गुन्ह्य़ांत या नागरिकांचा समावेश आढळून येत आहे. अमली पदार्थाची तस्करी आणि इतर गैरप्रकारांत त्यांचा सहभाग आहे.  नुकतेच नालासोपारा येथे नायजेरियन नागरिकांकडून कोटय़वधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकारानंतर पुन्हा  शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न उभा राहिला आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर, अग्रवाल यासह इतर ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात परदेशी नागरिकांच्या वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्यामार्फत रात्री-मध्यरात्री अवैध प्रकार केले जात आहेत. त्यांच्या दादागिरीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या व त्या ठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फसवुणकीचे गुन्हे आणि अमली पदार्थाची तस्करी यात नायजेरियन नागरिकांचा सहभाग असतो. मात्र, पोलिसांकडे त्यांची नोंद नसल्याने पोलिसांना त्यांचा माग काढता येणे शक्य होत नाही. या नागरिकांना सहजगत्या भाडय़ाची घरे उपलब्ध होतात. तसेच त्यांना वाहनेही मिळतात. त्यांना कागदपत्रे मिळवून देणारी टोळीही कार्यरत आहेत.

पोलीस ठाण्यात असलेल्या नोंदी

* तुळिंज-१९

* अर्नाळा सागरी-६

* वालीव -२४

* माणिकपूर -०२

* नालासोपारा -०२

* वसई – ००

पोलिसांची मोहीम थंड

मोठा गुन्हा घडला की पोलीस नायजेरियन नागरिकांविरोधात शोधमोहीम काढतात. मात्र ती तात्पुरती असते आणि ठोस कारवाई होत नाही. या नायजेरियन नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना घरे भाडय़ाने देण्यापूर्वी त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु ही मोहीम थंडावली आहे.

शहरात ज्या भागात अनधिकृतपणे नायजेरियन नागरिक राहत आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई केली जाणार आहे.

-संजय पाटील, पोलीस उपायुक्त वसई