एका तासात आईचे दूध मिळवून देण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या मोहिमेला यश

मूल जन्मल्यानंतरचा पहिला एक तास त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या एक तासात तान्ह्य़ा मुलाला आईचे दूध पाजले तर त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढीस लागते आणि ती त्याला संपूर्ण जन्मभर फायदेशीर ठरते. म्हणून या तासाला सुवर्ण तास असे संबोधले जाते. शहरात जन्माला येणाऱ्या अर्भकांना आईचे दूध पहिल्या एक तासात मिळावे यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या मोहिमेला यश आले आहे. सुमारे साडे पाच हजार नवजात बालकांना एक तासाच्या आत आईचे दूध मिळाले आहे.

‘राष्ट्रीय स्तनपान प्रोत्साहन कार्यक्रमा’अंतर्गत नवजात अर्भकांसाठी शासनाने ‘मा’ (मदर्स अ‍ॅब्सोल्यूट अफेक्शन) ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत प्रसूतीनंतर पहिल्या तासात स्तनपानासाठी प्रोत्साहन देणे तसेच याबाबत स्तनदा मातांमध्ये जागृती निर्माण करणे, वैयक्तिक समुपदेशन, बाळंतपणानंतर लगेचच आईचे दूध मिळेल, याची दक्षता घेणे आणि त्यावर लक्ष ठेवणे आदी बाबींचा यात समावेश आहे. यासाठी महापालिकेच्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महापालिकेच्या भाईंदर पश्चिम आणि मीरा रोड येथील रुग्णालयात तसेच शहरातील विविध आरोग्य केंद्रात येणाऱ्या गर्भवतींना बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एक तासात त्याला आईच्या दुधाचे महत्त्व पटवून देण्यात आले, ठिकठिकाणी याबाबतची शिबिरे घेण्यात आली तसेच आरोग्य सर्वेक्षणासाठी आणि लसीकरणासाठी घरोघरी जाणाऱ्या आशा सेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात महापालिका रुग्णालयात जन्माला आलेल्या तब्बल ५ हजार ४५० नवजात बालकांना पहिल्या एक तासात त्यांच्या आईचे दूध पाजण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले. यातही मीरा रोडच्या आरोग्य केंद्रात डॉ. तेजस्वीनी लांजेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १ हजार १३५ बालकांना याचा लाभ मिळवून दिला. आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्ट यांच्या हस्ते त्यांचा पोरितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. बालकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढीस लावणारी ‘मा’ ही योजना खासगी रुग्णालयांनी देखील राबवली, तर शहरातील नवजात बालकांसाठी ती वरदान ठरणारी आहे असे, आवाहन महापालिकेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. अंजली पाटील यांनी केले आहे.