काहीजणांकडून खासगी वाहनांचा उपयोग; अधिकृत परवानीशिवाय बहुतेकांचे प्रयाण

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीत रोजगार बुडाल्याने ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांत मिळून ५५ हजार नागरिक पुन्हा गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत. १ मे रोजी केंद्र सरकारने टाळेबंदीचा कालावधी १७ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी शहरे सोडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील सर्वाधिक नागरिक हे कल्याण-डोंबिवलीतील आहेत. अधिकृत परवानगीशिवाय अनेक रहिवासी खासगी वाहने तसेच पायी रवाना झाले आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

५५ हजार नागरिकांमध्ये परप्रांतीय मजुरांसह राज्यातील इतर जिल्ह्य़ांत जाणाऱ्यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने परप्रांतांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठीही विशेष श्रमिक रेल्वे गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीचा काळ सातत्याने वाढत असल्याने तसेच हाती पैसे शिल्लक नसल्याने जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मागील १० दिवसांत ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, दिवा, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील पोलीस ठाण्यांत नागरिकांची गावी जाण्याचे अर्ज करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात २ ते १२ मे या कालावधीत ऑफलाइन आणि ऑनलाइन आलेल्या अर्जानुसार पोलिसांनी ५५ हजार ७५१ नागरिकांना गावी जाण्याची परवानगी दिली आहे. कल्याण-डोंबिवलीमधून २९ हजारांहून अधिक नागरिक गावी रवाना झाले.

विशेष पथक

अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळांतील प्रत्येक परिमंडळात विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नागरिकांना त्यांच्या परवान्याच्या सद्यस्थितीची माहिती देत असते.

दिव्यातील मजुरांना प्रतीक्षा

टाळेबंदी काळात गावी जाण्यासाठी यादीत दिव्यातील मजुरांना स्थान मिळाले नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आठ दिवसांपूर्वी अर्ज भरून आणि वैद्यकीय तपासणी करूनही विशेष रेल्वे गाडीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने या मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिव्यातील जयादिन यादव यांनी टाळेबंदीत रोजगार बंद असल्याने आठ दिवसांपूर्वी रांग लावून बनारस या ठिकाणी जाण्यासाठी अर्ज केला होता. अर्जानंतर होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी रांगाही लावल्या होत्या.

शहरे                                    नागरिक

ठाणे ते दिवा                         ६ हजार ३८६

भिवंडी                                १८ हजार ४६४

डोंबिवली ते कल्याण            २९ हजार ०७४

उल्हासनगर ते बदलापूर         ९९१

विशेष शाखेकडून देण्यात

आलेली परवानगी                ८३६

एकूण                              ५५ हजार ७५१