२०१७ मध्ये ठाण्यात बिल्डरांविरोधात ५५१ तक्रारी; पीडित नागरिकांची ग्राहक मंचाकडे दाद

सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर संपदा प्रकल्पांच्या निर्मिती तसेच विक्री व्यवहारांत पारदर्शकता यावी तसेच यासंबंधीच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करता यावे, यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचा (महारेरा) कारभार सुरू झाल्यानंतरही बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारांत घट झालेली नाही. गेल्या वर्षी ठाणे ग्राहक मंचाकडे बांधकाम व्यावसायिकांबाबत आलेल्या तक्रारींमध्ये आधीच्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७मध्ये ग्राहक मंचाकडे दाखल झालेल्या एकूण ८०४ तक्रारींपैकी तब्बल ५५१ तक्रारी या बिल्डरांविरोधात आहेत.

ग्राहक मंचाकडे गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी बिल्डरांविषयीच्या तक्रारींचे प्रमाण हे सर्वाधिक ६८.५३ टक्के इतके आहे. तर उर्वरित ३१.४७ टक्के तक्रारी या इतर क्षेत्रातील आहेत. गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्य़ातील नागरीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. ठाण्यातील घोडबंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा भागात मोठय़ा प्रमाणावर घरबांधणी सुरू असून या ठिकाणी स्वस्त घरे ग्राहकांसाठी दिवास्वप्न ठरू लागले आहे. असे असले तरी जिल्ह्य़ातील महत्त्वांच्या शहरांमध्ये घर खरेदीचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी ग्राहकांचे फसवणुकीचे प्रकारही वाढत असल्याचे चित्र गेल्या वर्षभरात पाहायला मिळाले आहे.

विकसकांकडून फसवणुकीच्या सर्वात जास्त तक्रारी ठाणे जिल्ह्य़ातून प्राप्त होत आहेत, अशी माहिती ठाणे ग्राहक मंचाचे मुख्य निबंधक चंद्रकांत उगले यांनी दिली. बांधकाम व्यावसायिक पैसे घेतात मात्र मुदतीत घरे बांधून देत नाहीत किंवा नोंदणी व्यवहारात फसविणे, सांगितलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी जागा देणे तसेच बांधकामासाठी एखादी जागा खरेदी केल्यानंतर त्याचे व्यवहार अर्धवट करणे, बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी ग्राहक मंचाकडे सर्वाधिक येत आहेत. या व्यतिरिक्त एक घर अनेकांना विकणे अशा तक्रारीही वाढल्या असल्याचे उगले यांनी सांगितले.

तक्रारींचे प्रमाण

क्षेत्र                            २०१७   २०१६

बांधकाम                    ५५१     ४६४

व्यावसायिक

विमा                          ४८      ३१

बँकिंग                      २८        २३

टेलीकॉम                   २०      १५

महाराष्ट्र                  १६      १२

विद्युत मंडळ

वाहतूक                     १५      ११

इलेक्ट्रिकल                १७     ११

इलेक्ट्रॉनिक वस्तू

वैद्यकीय                    १५     ९

शिक्षण                      ०५     ६

अन्य                         ८९     ५७

‘महारेरा’सारखे कायदे तसेच ग्राहक मंचाचा प्रसार झाल्याने ग्राहकांमध्ये जागरूकता वाढली आहे. विकासकांकडून फसवणूक झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्य़ातून येत आहेत. ग्रामीण भागांतील घरबांधणी क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहेत. काही ठिकाणी एकच घर अनेकांना विकण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे प्रमाण भिवंडी परिसरात जास्त आहे.

– चंद्रकांत उगले, मुख्य निबंधक, ठाणे ग्राहक मंच