५६३ इमारती धोकादायक ; संक्रमण शिबिरे नसल्याने अडचणी

वसई : करोनाच्या संकटापाठोपाठ आता वसई-विरार महापालिका क्षेत्रातील धोकादायक असलेल्या इमारतींचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेतर्फे धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देण्यात आल्या होत्या. एकूण ५६३ इमारती धोकादायक आहेत. त्यामध्ये १८० अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. मात्र यावर पालिकेकडून नोटिसा देण्यापालिकेकडे यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या नऊ  प्रभागांमध्ये असलेल्या धोकादायक इमारतींची यादी वसई-विरार महापालिकेने  जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५६३ इमारती या धोकादायक आहेत. त्यामध्ये १८० अतिधोकादायक आहेत. या इमारतींना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अद्यापही इमारती खाली केल्या नसल्याने धोकादायक स्थितीत राहत आहेत.

प्रत्येक वर्षी पालिकेकडून शहराचे सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा दिल्या जातात. त्यामध्ये अतिधोकादायक असलेल्या इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले जाते. परंतु या नागरिकांना राहण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. तसेच नवीन घर घेणे किंवा तुटपुंज्या पगारात भाडय़ाने राहणेसुद्धा नागरिकांना शक्य होत नसल्याने नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळाही सुरू झाला आहे. पावसात वादळी वारे यामुळे विविध प्रकारच्या घटना घडत असतात तर दुसरीकडे करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच आता धोकादायक असलेली इमारत कोसळण्याची भीती यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.

संक्रमण शिबीर नसल्याने अडचणी

धोकादायक व अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यांना पालिकेच्या वतीने इमारत खाली करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे जरी असले तरी या नागरिकांच्या राहण्याची सोय कशी केली जाईल व इमारती खाली करून कोणत्या ठिकाणी राहायचे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पालिकेकडे संक्रमण शिबीर नाही तसेच त्याची कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी राहण्याची सुविधा करण्याची तरतूद नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.