वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

ठाणे : वर्तकनगर भागातील पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्याच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. या पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या १ हजार ६०० सदनिकांपैकी ५६७ सदनिका पोलिसांना मोफत देण्यात येणार असून त्यामध्ये निवृत्त पोलिसांनाही घरे दिली जाणार आहेत.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन या पुनर्विकासाची घोषणा केली. यावेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे उपस्थित होते. ठाणे येथील वर्तकनगर भागात पोलिसांची वसाहत आहे. या इमारतीमधील ८५६ सदनिका म्हाडाने १९७३ मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाला दिल्या होत्या. गेल्या ४६ वर्षांंमध्ये या इमारतींची योग्यप्रकारे देखभाल आणि दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने रिकाम्या करून पाडण्यात आल्या आहेत, तर उर्वरित इमारतीमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तसेच काही कुटुंबांना इमारत धोकादायक झाली म्हणून भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या सर्वच इमारती गेल्या काही वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत होते. भाजप सरकारच्या काळात या इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नसल्यामुळे इमारतींचा पुनर्विकास होऊ  शकला नव्हता.

मंगळवारी झालेल्या बैठकीत या इमारतीचा रखडलेला पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. पुनर्विकासातून निर्माण होणाऱ्या १ हजार ६०० सदनिकांपैकी ५६७ सदनिका पोलिसांना मोफत देण्यात येणार आहेत. तर उर्वरित सदनिकांपैकी आणखी १० टक्के सदनिका पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय १० टक्के घरे ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. नऊ  वर्षांपासून वर्तकनगरमधील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होतो. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्याकडे महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनी म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावला, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.