अंबरनाथमध्ये ३, भिवंडीत २, शहापूरमध्ये १ केंद्र

अंबरनाथ : एकीकडे अस्तित्वात असलेल्या लसीकरण केंद्रांना लस मिळताना अडचणी येत असल्या तरी जिल्ह्य़ात नव्या सहा लसीकरण केंद्रांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यात अंबरनाथ शहरातील तीन केंद्रांचा समावेश आहे, तर भिवंडी तालुक्यात दोन आणि शहापूर तालुक्यातील एका केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. यातील बहुतांश केंद्रे सशुल्क आहेत. मात्र लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी पाहता नागरिकांना या केंद्रांमुळे दिलासा मिळणार आहे.

सध्या राज्यभरात लशींचा तुटवडा असल्याने विविध ठिकाणची लसीकरण केंद्रे एक दिवसाआड बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यातही जेव्हा लस उपलब्ध होते ती घेण्यासाठी नागरिक मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत. अशावेळी १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणाला परवानगी मिळाल्याने केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. अंबरनाथ, बदलापूर यांसारख्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये आणि जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामध्ये अजूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लसीकरण केंद्रे आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात लसीकरण केंद्रे  वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कोविड जिल्हा टास्क फोर्सच्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ात नव्या लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव मांडला होता. शासनाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्य़ातल्या सहा लसीकरण केंद्रांना जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांनी प्रमाणित केल्याने मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अंबरनाथ शहरात तीन नव्या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.

अंबरनाथ शहरात सध्या आयुध निर्माण संस्थेत एकमेव केंद्रात लसीकरण सुरू आहे. इतर दोन केंद्रांमध्ये तांत्रिक बिघाड आणि सुविधांची पूर्तता न केल्याने लसीकरण सुरू होऊ  शकले नाही. मात्र नव्या तीन केद्रांमध्ये पूर्वेला शिवकृपा रुग्णालय आणि गौतम रुग्णालयाचा तर पश्चिमेला जीया मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा समावेश आहे.

भिवंडी तालुक्यात दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यात काल्हेर येथील एस.एस. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ओझोन रुग्णालयाचा समावेश आहे. शहापूर तालुक्यात पंडित नाक्याजवळील रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा समावेश आहे. या नव्या लसीकरण केंद्रांमुळे शासकीय केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नव्या केंद्रांमध्ये खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे ही केंद्रे सशुल्क लसीकरणाची आहेत हे स्पष्ट झाले आहे. या रुग्णालयांनी लस निर्मात्यांकडूनच परस्पर लससाठा खरेदी करायचा आहे. या केंद्रावर लस देणारे वैद्यकीय कर्मचारी आणि नोंदणी करणाऱ्या तंत्रज्ञांनाप्रशिक्षण दिले जाणार आहे.