थकबाकीदार जमीनमालक, विकासक यांचा चांगला प्रतिसाद

कल्याण : मालमत्ता कर, मुक्त जमीन कर थकबाकीदारांनी थकीत कराच्या रकमा वेळेत भराव्यात यांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या योजनेला थकबाकीदार जमीनमालक, विकासक यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दीड महिन्यात पालिका तिजोरीत ६० कोटी रुपये भरणा केले आहेत. याच कालावधीत मागील वर्षी ३३ कोटी रुपये जमा झाले होते.

नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात टाळेबंदीने झाली. त्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा करोना नियंत्रण कामात व्यग्र झाली. मागील सहा ते सात महिन्यांच्या काळात मालमत्ता करवसुली पुरेशा प्रमाणात झाली नाही. त्याचा परिणाम विकासकामे, पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. हा खड्डा भरून काढण्यासाठी नेहमीची अभय योजना प्रशासनाने थकबाकीदार करदात्यांसाठी सुरू केली आहे. ज्या विकासकांनी चालू वर्षीच्या मोठय़ा कराच्या रकमा थकविल्या आहेत. त्यांच्या चालू गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्व दाखला देणे थांबविण्यात आले आहे. त्यामुळे विकासक अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत. कल्याणमधील ब प्रभागातील बारावे येथील एका विकासकाने पालिकेचा मुक्त जमीन कर थकविला होता. प्रशासनाने त्यांच्या गृहप्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला. करभरणा केल्याशिवाय पूर्णत्व दाखला मिळणार नाही, असे विकासकाला कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अभय योजनेतून या विकासकाने पालिकेत पाच कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला. दरवर्षी पालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेतून प्रशासनाला सुमारे १०० ते १२५ कोटींचा महसूल मिळतो.

७५ टक्के व्याज माफ

अभय योजनेत चालू वर्षांची संपूर्ण कराची थकीत एकरकमी रक्कम, तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम जमीनमालक, विकासकांनी पालिकेत भरणा केल्यास ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे. १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबपर्यंत ही कर सवलत योजना चालू असणार आहे.