नव्या मतदारांत महिला अधिक, ३० ते ४९ वर्षे वयोगटातील ३० लाख मतदार

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी यंदा ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन मतदारसंघांत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी दिली. जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा पाच लाख ८० हजार ७८३ नवीन मतदारांची नोंद झाली आहे.

केंद्रीय निवडणूक विभागाकडून रविवारी लोकसभा निवडणुकांचे नियोजन जाहीर झाल्यानंतर ठाणे जिल्हा व्यवस्थापनानेही नियोजन सुरू केले आहे. याविषयीची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील लोकसभा मतदारसंघांमध्ये घेण्यात येणाऱ्या निवडणुकांची माहिती दिली. या तीनही मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दोन महिने आधीपासून जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार नावनोंदणी अभियान राबवण्यात आले.

२०१४ च्या तुलनेत यंदा पाच लाख मतदार वाढले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली. २०१४ मध्ये ३२ तृतीयपंथीय मतदारांची नोंद झाली होती. यंदा आणखी ३०८ तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे. यंदा ३८८३ अपंग मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सहा हजार ४८८ मतदान केंद्रे जिल्ह्य़ात उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाढ होण्याचीही शक्यता असल्याचे जिल्ह्य़ाधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्य़ात १४ हजार ६३४ बॅलेट यंत्रे, आठ हजार ३६८ कंट्रोल युनिट यंत्रे, तर नऊ हजार २९९ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्य़ातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. सुयोग्य आणि निर्दोष पद्धतीने निवडणूक पार पाडण्याचा ठाणे जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

भरारी पथके आणि नियंत्रण समिती

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात ७२ भरारी पथके आणि २१ दृक्श्राव्य चित्रीकरण पथके तैनात करण्यात येणार आहेत. ७२ स्थिर देखरेख पथके असणार आहेत. तसेच आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्य़ातील निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्याकरिता जिल्हास्तरीय नियंत्रण समिती तैनात असणार आहे. उमेदवारांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.