22 November 2019

News Flash

कल्याणमध्ये महावितरणचे बळकटीकरण

अखंड वीजपुरवठय़ासाठी ६०३ नवीन रोहित्र कार्यान्वित

अखंड वीजपुरवठय़ासाठी ६०३ नवीन रोहित्र कार्यान्वित

भगवान मंडलिक, कल्याण

कल्याण शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. वाढत्या वस्त्यांना अखंड आणि विनाखंडित वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणने ६०३ नवीन रोहित्रे बसवली आहेत. आठ उपक्रेंद्रांच्या माध्यमातून या विस्तारित वस्त्यांना विजेच्या लपंडावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन कोटी ५८ लाख ७९ हजार योजनेचा हा वीज बळकटीकरणाचा आराखडा महावितरणच्या कल्याण विभागाने तयार केला आहे. वीज बळकटीकरणाचा लाभ या परिसरातील ४९ हजार वीज ग्राहकांना झाला आहे.

महावितरणच्या प्रस्तावित आणि प्रगतिपथावर असलेल्या विकास आराखडय़ात महावितरण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात महावितरणचे कोणते विकास प्रकल्प सुरू आहेत. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कशी प्रयत्नशील आहे याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिली. यावेळी महावितरणला येणाऱ्या अडचणी त्यांनी मंत्री चव्हाण यांना सांगितल्या. महावितरण हे शासनाचे एक अंग आहे. राज्यातील इतर पालिकांमध्ये महावितरणाला विजेचे खांब किंवा खोदकामासाठी चौरस मीटरचा दर कमी आहे.

पुणे, नवी मुंबई, ठाणे व इतर पालिकांमध्ये महावितरण खोदाईच्या माध्यमातून दोन ते तीन हजार रुपये पालिकेकडे भरणा करते. पण, कल्याण डोंबिवली पालिकेने अवास्तव दर आकारल्याने काम करणे अवघड होऊन बसले आहे. हा दर रास्त करण्यात यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांकडे केली. याविषयी पालिका आयुक्तांशी बोलण्याचे आश्वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले.

कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी, गोदरेज हिल, उंबरडे, गौरीपाडा, टाटा हाऊसिंग, कर्मा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, नवली, टीटीपी या नव्याने विकसित झालेल्या वस्तीत १४६ रोहित्रांची क्षमता वाढ केली आहे. याच परिसरात १४ उपकेंद्र प्रस्तावित आहेत. त्यामधील आठ केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू केलीत. १६५ किमी लांबीच्या उच्चदाब वीजवाहिन्या सुरू केल्या आहेत. या कामासाठी ५० कोटी ६२ लाख प्रस्तावित आहेत. यामधील बहुतांशी कामे पूर्ण झालीत. विस्तारित कल्याण भागात वीजवाहिन्या वाढ, उपकेंद्र संख्या, रोहित्रांची संख्या वाढ केल्याने आणि त्यांची क्षमता वाढवल्याने या भागाचा वीजपुरवठा अखंड सुरू राहण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी या भागात लोकसंख्या कमी होती. त्यामुळे त्या प्रमाणात वीजपुरवठा केला जात होता. लोकवस्ती वाढली तरी वीजक्षमतेत वाढ झाली नव्हती. त्यामुळे वाढत्या वीज गरजेप्रमाणे वीज मागणी अधिक आणि पुरवठा तुटपुंजा त्यामुळे या भागातील वीज सातत्याने खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. या बळकटीकरणामुळे ती अडचण आता दूर झाली आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on June 25, 2019 4:28 am

Web Title: 603 nos of transformers put into action in kalyan zws 70
Just Now!
X