दुरुस्ती रखडल्याचे कारण

प्रसेनजीत इंगळे, विरार

वसई तालुक्यातील अंगणवाडय़ांची अवस्था बिकट झाली असून दुरुस्तीअभावी ६१ अंगणवाडय़ा बंद पडल्या आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या वादात या अंगणवाडय़ांची दुरुस्ती रखडली आहे. त्याचा परिणाम चिमुकल्या विद्यार्थ्यांवर होत आहे.

वसई-विरारमध्ये जिल्हा परिषदेच्या बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडय़ा चालवल्या जातात. बालविकास प्रकल्पाचे एकूण २ प्रकल्प आहेत. वसई प्रकल्प-१ मध्ये २०५ तर वसई-२ मध्ये १८४ अशा एकूण ३८९ अंगणवाडय़ा आहेत. मात्र या अंगणवाडय़ांची अवस्था बिकट झालेली आहे. वसई प्रकल्प-१ मध्ये १० अंगणवाडय़ा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. ३५ अंगणवाडय़ांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. प्रकल्प-२ मधील तीन अंगणवाडय़ा संपूर्ण नादुरुस्त असल्याने बंद आहेत, तर १३ अंगणवाडय़ा किरकोळ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा जवळपास एकूण ६१ अंगणवाडय़ा गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहत आहेत. यामुळे मुलांना बसवायचे कुठे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना सतावत आहे. लोकसेवेतून काही ठिकाणी समाज मंदिर, चाळी, खाजगी इमारती देऊन, सभागृहात अंगणवाडय़ा भरवल्या जात आहेत. असंख्य अंगणवाडय़ांच्या भिंती  पडक्या झाल्या आहेत. गळकी छते, वर्गात येणारे पाणी, खिडक्यांची दुरवस्था, भिंतींना पडलेल्या भेगा, तुटलेले पत्रे, अपुरी शौचालये अशा बिकट अवस्थेत या अंगणवाडय़ा सुरू आहेत.

जिल्हा परिषदेकडून निधी मिळत नसल्याचे आणि महापालिका हद्दीत अंगणवाडय़ा येत असल्याचे कारण पुढे करत आपली जबाबदारी झटकण्यात येत आहे, तर महापालिका अंगणवाडय़ा हस्तांतरित केल्या नसल्याचे सांगत विकासासाठी निधी उपलब्ध करून देत नाही. यामुळे मागील तीन वर्षांपासून ६१ अंगणवाडय़ा नादुरुस्त अवस्थेत रखडल्या आहेत.

मदत अपुरी

प्रकल्प-१च्या प्रकल्पाधिकारी धनश्री साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता, अंगणवाडय़ांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद आणि महापालिका यांना वारंवार पत्रे दिली जात आहेत. पण त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक प्रतिनिधी, समाजयोगी संस्था, पुढारी यांच्या सहकार्याने किरकोळ कामे केली जात आहेत. पण ही मदत अपुरी असल्याने अंगणवाडय़ा अजूनही विकसित करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.