आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जलसंचय

बदलापूर : गेल्या आठवडाभरापासून बारवी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठी २०७ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बारवी धरणाच्या विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे क्षमता वाढलेले धरण सध्या ६१ टक्के भरले आहे. तर जुन्या क्षमतेनुसार सध्याच्या घडीला धरण ८८ टक्के भरले आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नसले तरी कपातीशिवाय शहरांना पाणीपुरवठा करण्याइतके पाणी धरणात असेल, असा विश्वास एमआयडीसीकडून व्यक्त केला जातो आहे.

ठाणे जिल्ह्यतील जवळपास सर्वच महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंच वाढवण्याचे काम गेल्या वर्षांत मार्गी लागले. त्यामुळे बारवी धरणाची उंची वाढवल्याने जवळपास ४० टक्के अतिरिक्त साठा बारवी धरणात करता येत आहे. यापूर्वी बारवी धरणात २३५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा केला जात होता. मात्र चार मीटरने उंची वाढवल्याने सध्या धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा केला जाऊ   शकतो. गेल्या वर्षांत झालेल्या विक्रमी पावसाने जुलै महिन्यातच हे धरण नव्या पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरात पाणीकपातीची वेळ आली नव्हती. यंदाच्या वर्षांत जून आणि जुलै महिने कोरडे गेल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला धरणात निम्माच पाणीसाठा होता. त्यातही एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचा निर्णय लागू न करत नागरिकांना दिलासा दिला. मात्र गेल्या आठवडाभरात झालेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जुन्या २३५ दशलक्ष घनमीटर क्षमतेनुसार धरणात सध्या २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जुन्या क्षमतेच्या ८८ टक्के पाणीसाठा सध्याच्या घडीला धरणात आहे. तर नव्या क्षमतेनुसार हा पाणीसाठा ६१ टक्के आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास ऑगस्ट अखेरीस नव्या क्षमतेनुसार ९० टक्कय़ांपर्यंत धरण भरण्याची आशा आहे. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही तरी जिल्ह्यतल्या शहरांची मागणी पूर्ण करण्याइतके पाणी धरणात असेल असा विश्वास एमआयडीसी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्याच्या घडीला धरणातून कोणताही विसर्ग केला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यची पाणीकपातीतून सुटका होण्याची आशा आहे.

जलस्थिती समाधानकारक

ठाणे जिल्ह्यत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यतील धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे. जिल्ह्यतील भातसा धरण सध्या ७० टक्के भरले आहे. तर मध्य वैतरणा धरण ६३ टक्के भरले आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही ६० टक्कय़ांवर पाणीसाठा झाला आहे.