ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हा प्रशासनासमोरील चिंतेचा विषय बनत चालला आहे. शनिवारी ४८ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर, रविवारी तब्बल ६२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. एकाच दिवसात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे शहरात एकूण करोना बाधितांचा आकडा ६८० वर पोहचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंबरथान शहरात याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे अहवाल पॉजिटीव्ह येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत २० जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. शहरातील २७३ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून १२० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील १७ भाग प्रतिबंधित केले आहेत. आतापर्यंत २६८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. मात्र समुह संसर्गातून रुग्णांच्या वाढत्या संख्येवर कसा निर्बंध ठेवायचा हा नवीन प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला आहे.