महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी ७० लाख खर्च

ठाणे : करोना संकटामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खराब झाल्याचे सांगत पुढील आर्थिक वर्षांसाठी काटकसरीचा संकल्प सोडणाऱ्या महापालिका प्रशासनाला १५ दिवसांतच या संकल्पाचा विसर पडला आहे. पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने महापौरांसह अन्य पालिका पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी फक्त महापौरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनाची किंमत १९ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. जून महिन्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथील करण्यात आली. मात्र त्यानंतरही महापालिकेची आर्थिक स्थिती रुळावर आलेली नाही.  उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रशासनाने काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वच विभागांत काटकसरीशिवाय पर्याय नाही अशी स्पष्ट भूमिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मांडली आहे. तसेच हा अर्थसंकल्प अधिक वास्तववादी असल्याचा दावाही त्यांनी केला. डॉ. शर्मा यांनी अर्थसंकल्प मांडून पंधरवडा उलटत नाही तोच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी नवी वाहने खरेदीचा ७० लाख रुपयांचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने मांडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गेल्या वर्षी बराचसा काळ टाळेबंदीत गेल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा फार प्रवास झालेला नाही. ठाणे महापालिकेतील काही पदाधिकारी तर घरात बसून नियमित करोना परिस्थितीचा नियमित आढावा घेत होते. असे असतानाही पदाधिकाऱ्यांची वाहने जुनी झाली आहेत असे कारण पुढे करत अभियांत्रिकी विभागाने हा प्रस्ताव मांडल्याने वाहन खरेदीची खरच आवश्यकता आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. अभियांत्रिकी विभागाने मांडलेल्या प्रस्तावानुसार महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष अशी एकूण ७ नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीच्या आधारे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

 

पद                                                         वाहन                                       खर्च (रुपये)

महापौर                                              हुंडाई एलेंट्रा                                       १९,६०,६००

उपमहापौर, सभागृह नेते,   प्रत्येकी

स्थायी समिती सभापती                            होंडा सिटी                                 १०,९३,२२१

महिला व बालकल्याण समिती सभापती,

वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष,     मारुती डिझायर  प्रत्येकी

माजिवाडा-मानपाडा समिती अध्यक्ष                                                              ६,१५,०२०