ठाणे : ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांनाही करोनाची लागण होऊ लागली आहे. ठाणे पोलीस दलातील ७० पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे शहर पोलीस दलात सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे. गेल्यावर्षी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित झाले होते. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता. आता वर्षभरानंतर म्हणजेच मार्च महिन्यापासून शहरात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यासोबतच टाळेबंदीच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ७० पोलीस करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १३ पोलीस अधिकारी तर ५७ पोलीस कर्मचारी आहेत.

३५ पोलिसांचा मृत्यू

गेल्या वर्षभरात ठाणे पोलीस दलातील २ हजार १०८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यामध्ये २५४ अधिकारी आणि १ हजार ८५४ कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. २ हजार १०८ रुग्णांपैकी २ हजार १ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.