News Flash

कल्याण, डोंबिवली शहर प्रदूषणाच्या विळख्यात

कल्याण रेल्वे स्थानक, शिवाजी चौक यासारख्या भागात अठरा ते वीस तास वाहनांची सतत घरघर सुरू असते.

वाहनांमुळे ७० टक्के प्रदूषण; महापालिकेचा अहवाल
कल्याण-डोंबिवली शहरांमधील ७० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होत आहे, असा निष्कर्ष महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अहवालात काढण्यात आला आहे. २५ टक्के प्रदूषण उद्योग, व्यवसायांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे तर पाच टक्के प्रदूषण बांधकामे, त्यातून उडणारा धुरळा, जेसीबी, पोकलेन यांसारख्या यंत्रांमुळे होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ‘स्काय लॅब अ‍ॅनालिटिकल लॅबोरेटरी’ या प्रयोगशाळेने शहरातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करून हे निष्कर्ष अहवालात नोंदवले आहेत. डोंबिवलीतील प्रदूषणाचा भार उद्योगांवर टाकण्यात आल्याने औद्योगिक पट्टय़ातील कारखानदारी पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या वर्षी पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या सरी बरसल्याने येथील औद्योगिक पट्टय़ालगत उभारण्यात आलेल्या नागरी संकुलांमध्ये भीतीचे सावट होते. या पाश्र्वभूमीवर पर्यावरण प्रदूषित होण्यामागे वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि औद्योगिक पट्टय़ातील उद्योगांचा वाटा सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमधून पुन्हा एकदा चिंतेचा सूर व्यक्त होत आहे. वाहने तसेच उद्योगांमधून बाहेर पडणारा धूर, धुलिकण या माध्यमातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्साईड ही प्रदूषके मोठय़ा प्रमाणात हवेत मिसळतात. ही प्रदूषके वातावरणात किती प्रमाणात असावीत, यासाठी कायदा १९८१ नुसार केंद्र शासनाने प्रदूषकांसाठी मर्यादा निर्धारित केल्या आहेत.

विविध आजारांना निमंत्रण
या प्रदूषणाचे हवेतील प्रमाण वाढल्याने वाहन चालविताना, प्रवासात सतत संपर्क आला तर श्वसनाचे विकार, फुप्फुस, हृदयरोग, कर्करोग अशा प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. गर्भवती स्त्रियांना ही प्रदूषके खूप धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी वाहनाने प्रवास करताना नेहमी मुखवटा बंद करून प्रवास करावा, असे आवाहन या अहवालातून करण्यात आले आहे.
कल्याण वायुप्रदूषणाचे आगार
कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि शिवाजी चौक भागात सतत वाहनांची वर्दळ असल्याने या भागांमध्ये हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक अन्य भागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. डोंबिवली विभागीय कार्यालय, शहाड जकात नाका, आधारवाडी, रामबाग, फडके रस्ता भागातील हवाप्रदूषण निर्देशांक मागील तीन वर्षांपेक्षा कमी झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानक, शिवाजी चौक यासारख्या भागात अठरा ते वीस तास वाहनांची सतत घरघर सुरू असते. या ठिकाणच्या प्रदूषणाने टोक गाठल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
शांतता क्षेत्रात गजबजाट
कल्याण-डोंबिवली पालिकेने जाहीर केलेली सर्व १६ शांतता क्षेत्रे ही दहा ते पंधरा तास गोंगाटात असतात. कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण जिल्हा सत्र न्यायालय, के. सी. गांधी हायस्कूल, मोहनसिंग काबूलसिंग शाळा, लाल चौकीजवळील शारदा विद्यालय ही शांतता क्षेत्रे अनेक तास वाहनांच्या गजबजाटाने वेढलेली असतात. विशेष म्हणजे सगळी वाहने या शांतता क्षेत्रामधून कर्णकर्कश आवाज करीत ये-जा करतात. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, मंजुनाथ विद्यालय, जोंधळे हायस्कूल, चोळेगाव हनुमान मंदिर ही शांतता क्षेत्रे वाहनांच्या गोंगाटात असतात. शांतता क्षेत्रांच्या संरक्षक भिंतींना खेटून वाहनांची ये-जा सुरू असते. केवळ शासनाला दाखविण्यासाठी पालिकेने कागदोपत्री ही शांतता क्षेत्रे घोषित केली आहेत. प्रत्यक्षात ती अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. मंजुनाथ शाळेसमोर वाहनांना ये-जा करण्यास व पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसते, इतकी वाहतूक कोंडी या भागात होते. तरीही ही शाळा शांतता क्षेत्र म्हणून कोणी निश्चित केली, असा प्रश्न केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 12:42 am

Web Title: 70 pollution in kalyan dombivli city due to vehicles
Next Stories
1 फुलपाखरांच्या जगात : इंडियन सनबीम
2 दळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय
3 निमित्त : ब्रिटिशकालीन पूल- शोध आणि बोध
Just Now!
X