काळानुरूप जीवनशैली बदलत असली तरी काही गोष्टी त्याला अपवाद असतात. त्यातले एक ठळक उदाहरण म्हणजे भारतीय समाजमनाला असलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची हौस. मध्यंतरीच्या काळात साज शृंगाराच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला असला तरी त्यातील सोन्याच्या दागिन्यांचे स्थान अबाधित आहे. गावठाणाचे स्वरूप असणाऱ्या ठाण्यात ७० वर्षांपूर्वी यशवंत विठ्ठल मराठे यांनी सोन्या-चांदीचे दुकान थाटले. सोन्या-चांदीचे भाव, दागिन्यांचे स्वरूप आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीत गेल्या सात दशकात आमूलाग्र बदल झाला असला तरी सोन्या-चांदीचे दागिने घडविण्यातले मराठे परिवाराचे कसब मात्र कायम आहे. यशवंत मराठय़ांनी लावलेले हे व्यवसायाचे रोपटे त्यांच्या तिसऱ्या पिढीने फक्त जोपासलेच नाही, तर अतिशय मेहनतीने वाढविले आहे.

कर्नाटकमधील नळदुर्ग येथील यशवंत विठ्ठल मराठे ठाण्यात राहणाऱ्या शंकर विठ्ठल या थोरल्या भावाकडे शिक्षणासाठी आले. शंकर विठ्ठल नोकरी करीत होते. मात्र धाकटय़ा यशवंतला कारकुनी नोकरीत फारसा रस नव्हता. त्यामुळे मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी एका सराफी पेढीवर नोकरी पत्करून सोनारकाम काम शिकून घेतले. कालांतराने हे दुकान बंद पडल्यानंतर त्यांनी स्वत:च सोन्या-चांदीचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र सुरुवातीच्या काळात ते काम अतिशय छोटय़ा स्वरूपाचे होते. त्यामुळे जोड व्यवसाय म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर फिरून मोती विक्रीचा व्यवसाय केला. जपानच्या मिका-मोटो कंपनीचे मोती ते विकत असत. पुढे व्यवसायात जम बसल्यानंतर १९४५ मध्ये त्यांनी ठाण्याच्या बाजारपेठेत स्वत:चे सोन्या-चांदीचे दागिने घडवून देणारे दुकान थाटले. सुरुवातीच्या काळात त्यांचे सख्खे पुतणे वामन आणि श्रीधर पेढीवर काम करीत होते. त्या वेळी सोन्याचा भाव ६२ रुपये तोळे होता.

tv678त्या वेळी ठाण्यात कोळी समाज मोठय़ा प्रमाणात होता. त्यानंतरच्या काळात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आले. हळूहळू शहर वाढले आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणीही वाढली. मात्र मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना साठच्या दशकात ‘गोल्ड कंट्रोल’ कायदा लागू झाला. समाजातील सोन्याचा हव्यास कमी व्हावा, या उद्देशाने सरकारने हा फतवा काढला होता. त्यानुसार १४ कॅरेटचे म्हणजेच ५८ टक्के सोने असणारे दागिनेच वापरणे बंधनकारक झाले. त्यामुळे अर्थातच ग्राहकांची संख्या रोडावली. पुढे पाच वर्षांनंतर सोन्याच्या दागिन्यांवरील हे र्निबध हळूहळू शिथिल झाले. त्या त्या काळात प्रचलित असणारे सर्व प्रकारचे दागिने अतिशय खात्रीपूर्वक पद्धतीने बनवून दिले जात असल्याने मराठय़ांची ख्याती वाढत गेली. पूर्वी वाडा, जव्हार या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातून मराठय़ांच्या दुकानात दागिन्यांसाठी ग्राहक यायचे. यथावकाश त्या त्या ठिकाणी सोन्या-चांदीची दुकाने झाली. फॅमिली डॉक्टरप्रमाणेच विशिष्ट सोनाराकडूनच दागिने घडवून घेण्याची कुटुंबाची सवयही मागे पडली. पारंपरिक दागिन्यांपेक्षा नव्या नक्षीदार साजांना पसंती मिळू लागली. वजनदार दागिन्यांचा सोस कमी होऊन कमी वजनाच्या नाजूक दागिन्यांचा जमाना आला.

मराठय़ांनी जेव्हा दुकान थाटले, तेव्हा शहरातील सोनारकाम करणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकी कमी होती. आता शहरात शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नामांकित पेढय़ांनी ठाण्यात शोरूम्स थाटले आहेत. मात्र या संक्रमणातही मराठे समूहाने शहरातील दागिन्यांच्या विश्वात आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सोन्याबरोबरच चांदीची भांडी, चौरंग, पाट आदी वस्तू मराठय़ांकडे केल्या जातात. हिऱ्यांप्रमाणेच हल्ली नक्षत्र रत्नांचा जमाना आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार लाभ आणि उत्कर्षांसाठी शिफारस करण्यात येणारी विविध प्रकारची रत्नेही मराठे बंधूंनी उपलब्ध करून दिली आहेत.

नथ बनविण्यात पारंगत
अगदी सुरुवातीपासून गोफ, वजट्रिक, मोहनमाळ, शिंदेशाही तोडे, चपला हार, कोल्हापुरी साज, वेणी, चाफ्याची फुले आदी अनेक प्रकारच्या दागिन्यांमध्ये मराठय़ांची ख्याती होती. मात्र त्यातही नथ बांधण्यात यशवंत विठ्ठल मराठे यांनी विशेष प्रावीण्य मिळविले होते. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची सून ताई फडके यांनी त्यांना नथ बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते.

तिसरी पिढी – सात दुकाने
यशवंत विठ्ठल मराठय़ांनी जुन्या बाजारपेठेत १९४५ मध्ये सुरू केलेली पेढी अजूनही सुरू आहे. मात्र दागिन्यांच्या विश्वातील बदलत्या वास्तवाची दखल घेऊन १९९७ मध्ये राम मारुती रोडवर मराठे बंधूंनी हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरूम उघडले. त्या काळात फक्त हिऱ्यांच्या दागिन्यांचे दुकान सुरू करणे ही जोखीम होती. मात्र मराठे समूह त्यात यशस्वी झाला. त्यानंतर २०१० मध्ये बी-केबिनमध्ये तिसरे दुकान थाटले. यशवंत मराठे यांना आनंद, विलास आणि विश्वास अशी तीन मुले. मोठा मुलगा आनंद बाजारपेठेतील दुकान सांभाळतात. त्यांचा मुलगा मंदार मराठे हिऱ्यांच्या शोरूम्सचे कामकाज पाहतात, तर विलास यांचे चिरंजीव शंतनू बी-केबिन येथील दुकानाचा कारभार पाहतात. काकांनी सुरू केलेल्या पेढीत अगदी सुरुवातीच्या काळात नोकरी करणाऱ्या वामन शंकर मराठे यांनी नंतरच्या काळात स्वतंत्र दुकान थाटले. ठाण्यात त्यांची दोन दुकाने आहेत. याव्यतिरिक्त मुलुंड आणि बदलापूरमध्येही त्यांचे शोरूम्स आहेत. त्यांची अजित आणि अभय ही दोन मुले सध्या व्यवसाय सांभाळतात. अशा प्रकारे मराठे कुटुंबीयांची तिसरी पिढी आता दागिन्यांच्या व्यवसायात असून एकूण सात दुकाने आहेत. सुप्रिया मंदार आणि तनुजा शंतनू या मराठे कुटुंबातील सुनाही आता व्यवसायात आहेत. दागिने निर्मिती आणि विक्रीच्या या व्यवसायाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहोर उमटवून यशवंत विठ्ठल मराठय़ांचे नाव जगभर नेण्याची उमेद ही नवी पिढी बाळगून आहे.