ठाणे-कल्याणदरम्यान अपघातांची संख्या लक्षणीय

मध्य रेल्वेमार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये गणल्या जाणाऱ्या ठाणे आणि कल्याण या रेल्वेस्थानकांदरम्यानचा मार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही स्थानकांदरम्यान तब्बल ७०० प्रवाशांना विविध कारणांमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बहुतांश बळी रेल्वे रूळ ओलांडताना गेल्याचे उघड झाले असून यातून प्रवाशांची बेफिकिरी आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी या दोन्हींचे दर्शन घडत आहे.

रेल्वेप्रवासादरम्यान किंवा रेल्वेमार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने रेल्वेचे अपघात जास्त होतात, त्या ठिकाणांची पाहणीही केली होती. परंतु, त्यानंतरही ठाणे ते कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. या वर्षी ठाणे रेल्वेमार्ग हद्दीत २७९ तर कल्याण रेल्वेमार्ग हद्दीत ३०९ जणांचा बळी गेला आहे तर, डोंबिवली रेल्वेमार्ग हद्दीत १४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांचे आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. डोंबिवली रेल्वेमार्गाच्या हद्दीत झालेल्या अपघातांपैकी १०० बळी रेल्वे रूळ ओलांडताना गेले आहेत. अशा अपघातांत जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. ठाण्यात २८९, कल्याणमध्ये ३१८ तर  डोंबिवलीत १३८ प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे.

या दोन्ही रेल्वेस्थानकांदरम्यान अपघातांत मृत्यू पावलेल्यांची या वर्षी नोव्हेंबपर्यंतची संख्या ७३४ इतकी आहे तर, ७४५ जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी, बळींची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या वर्षी, २०१६मध्ये या पट्टय़ात ९३७ तर २०१५मध्ये ७५६ प्रवाशांना अशा तऱ्हेने जीव गमवावा लागला होता.

संरक्षक भिंतीचा अभाव

प्रवाशांनी रूळ ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करावा, यासाठी सर्व स्थानकांतील पादचारी पुलांची संख्या वाढवण्यात येत आहे. मात्र, तरीही काही मिनिटांच्या घाईसाठी प्रवासी सर्रासपणे रेल्वे रुळांचा वापर करताना दिसतात. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी रुळांच्या शेजारी संरक्षक भिंत उभारलेली नाही.

रेल्वेच्या हद्दीत सुरक्षा भिंत आणि पादचारी पूलाच्या बांधणीचे काम सुरू आहे. तसेच रेल्वे रूळ ओलांडणे थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.   – ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करत असतो. तसेच यासाठी परदेशातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कल्याणमध्ये ज्या ठिकाणी रुळ ओलांडण्यात येतात. तिथे भुयारी मार्ग आणि पादचारीपूलाचे काम सुरू आहे.   – श्रीकांत शिंदे, खासदार.