News Flash

औषधनिर्माणशास्त्र बोगस पदवीप्रकरण : सातशे विद्यार्थ्यांची फसवणूक? 

दुसऱ्या वर्षी याच विद्यापीठात प्रवेश देऊन संस्थेने १ लाख २० हजार रुपये शुल्क घेतले होते.

संग्रहित छायाचित्र

ठाणे : ठाणे येथील कोलशेत भागातील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन संस्थेचा अध्यक्ष पुरुषोत्तम ताहीलरामानी याने औषधनिर्माणशास्त्राचे बनावट प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले असतानाच त्यापाठोपाठ आता या संस्थेला भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेची (पीसीआय) मान्यता नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औषधनिर्माणशास्त्रासंबंधी कोणतेही प्रशिक्षण घेण्याची मान्यता नसतानाही संस्थेने राजस्थान आणि अन्य विद्यापीठांच्या नावाने विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले असून या संस्थेने अशा प्रकारे आतापर्यंत सातशे विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत वर्तविण्यात आला आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वी औषधनिर्माणशास्त्र बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईमध्ये दहावी आणि बारावी परीक्षेच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ठाण्यातील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन संस्थेने कोणत्याही प्रशिक्षणाविना विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी औषध दुकाने थाटली होती. याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष पुरुषोत्तम ताहीलरामानी आणि बनावट प्रमाणपत्राच्या आधारे औषध दुकान चालविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील विविध संस्थांमधून दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्र मिळवून दिल्याचे तपासात उघड झाले होते. तसेच पोलिसांच्या कारवाईनंतर संस्थेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली नव्हती. उलट विद्यार्थ्यांना मारहाण करून परत पाठविले होते. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाच या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून या संस्थेला भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषद (पीसीआय)ची मान्यता नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे येथील मनोरमानगर भागात राहणाऱ्या उमाकांत यादव (२१) या विद्यार्थ्यांने दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन संस्थेविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याआधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेला राजस्थानमधील ओपीजीएस विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम चालविण्यास परवानगी असल्याचे सांगत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी १ लाख २० हजार रुपये शुल्क घेतले होते. पहिल्या वर्षी ओपीजीएस विद्यापीठाचा निकाल देण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी याच विद्यापीठात प्रवेश देऊन संस्थेने १ लाख २० हजार रुपये शुल्क घेतले होते. दुसऱ्या वर्षांची परीक्षा झाली मात्र, त्याचा निकाल अद्याप दिलेला नाही. याबाबत केलेल्या चौकशीमध्ये संस्थेला भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेची मान्यता नसल्याचे समोर आले, असे उमाकांत याने तक्रारीत म्हटले आहे. औषधनिर्माण शास्त्रासंबंधी कोणतेही प्रशिक्षण घेण्याची मान्यता नसतानाही या संस्थेने राजस्थान आणि अन्य विद्यापीठांच्या नावाने प्रवेश दाखवून २ लाख ६७ हजार ४०० रुपये शुल्क घेतले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली. अशा प्रकारे संस्थेने सातशे विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे, असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. संस्थेकडून काही विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम रोख आणि धनादेश स्वरूपात परत दिली जात आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचे धनादेश बँकेत वटलेले नाहीत, असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 4:34 am

Web Title: 700 students cheated in bogus degree of pharmacology zws 70
Next Stories
1 तपास चक्र : तारांकित देहविक्रीला चाप
2 मोलकरणीकडून दागिन्यांची चोरी
3 लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकाला शिक्षा
Just Now!
X