कल्याण-डोंबिवलीत करोनाने कहर केला आहे. कठोर टाळेबंदी लागू असूनही गेल्या दोन आठवडय़ांमध्ये या शहरांमध्ये सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

करोनाची संसर्गसाखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने २ जुलैपासून कठोर टाळेबंदी लागू केली. मात्र, या कालावधीत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात आली. दोन आठवडय़ांमध्ये ७,१४९ रुग्ण आढळले. पालिका प्रशासनाने करोना रुग्णांवर उपचारासाठी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, मांडा टिटवाळा, मोहने आणि २७ गावांसाठी पिसवली असे सात भाग केले आहेत. त्यातील कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व या दोन भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक दिसून येते.

२ ते १५ जुलै या कालावधीत डोंबिवली पूर्वेत तब्बल २,१०७ रुग्ण आढळले. याच कालावधीत कल्याण पश्चिममध्ये १,९७९ जण करोनाबाधित झाले. या दोन्ही भागांतील गृहसंकुले आणि चाळींमध्ये करोनाने शिरकाव केल्याचे चित्र आहे. दोन आठवडय़ांमध्ये कल्याण पूर्वेत १,४६५ जण तर डोंबिवली पश्चिमेत १,०६९ जणांना करोनाचा संसर्ग झाला. मोहने, मांडा-टिटवाळा या भागांतही करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या साठ हजारांवर

जिल्ह्यात बुधवारी करोनाचे १ हजार ९८१ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६०, ४८८ वर पोहोचली. बुधवारी ३७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,७२६ झाली आहे. बुधवारी कल्याण-डोंबिवलीत ४९८, ठाणे शहरात ४००, नवी मुंबई ३५६, उल्हासनगर २२६, ठाणे ग्रामीण २०४, मीरा-भाईंदर ९९, बदलापूर ८९, अंबरनाथ ५५ आणि भिवंडीमध्ये ५४ रुग्ण आढळले.

राज्यात आणखी ७,९७५ जण बाधित

राज्यात रुग्णवाढीचा वेग कायम असून, ७,९७५ नव्या रुग्णांचे निदान झाले. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये १३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात २३३ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या पावणेतीन लाखांवर गेली. आतापर्यंत राज्यात १०,९२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३४,७२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, पुणे (२५,५१०), मुंबईत (२२,८८८) उपचाराधीन रुग्ण आहेत.