ठाणे : राज्यात एकीकडे पोलिसांमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ठाणे पोलीस दलातून करोनाबाबतीत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. ठाणे शहर पोलीस दलातील ७२ टक्के पोलीस कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत १९२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या सर्व शहरात ठाणे पोलिसांचा आठ हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. दरम्यान, कर्तव्य बजावत असताना ६८५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात ७० पोलीस अधिकारी आणि ६१५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक करोनाबाधित हे मुख्यालयातील असून त्यांचा आकडा ११४ आहे. तर, विविध पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ठाणे पोलीस दलातील ६८५ पैकी ४८९ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करोनामुक्त झालेले आहेत. बरे झालेल्या पोलिसांमध्ये ५२ पोलीस अधिकारी आणि ४३७ पोलीस कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा कर्तव्यावरही रुजू झालेले आहेत, तर १९२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये १७ पोलीस अधिकारी आणि १७५ पोलीस कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. अलगीकरणात असलेले ३३१ अधिकारी कर्मचारी त्यांचा अलगीकरणातील कालावधी पूर्ण करून रुजू झाले असून केवळ ६३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संस्थात्मक तसेच गृह अलगीकरणात दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.