वाढत्या महागाईमुळे चोरांचीही वक्रदृष्टी
सध्या किलोमागे ७० रुपयांचा भाव गाठणाऱ्या कांद्यावरून सोशल मीडियावर विविध विनोद प्रसारित होत असले तरी या महागाईचे ‘गांभीर्य’ चोरटय़ांनाही उमगल्याचे चित्र बदलापूरमध्ये पाहायला मिळत आहे. बदलापूर पश्चिमेतील एका किराणा दुकानातून चोरटय़ांनी चक्क ७५ किलो कांदा आणि ४० किलो लसणाची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
तोंडाला येणाऱ्या कांद्याच्या वासावरून तरुणाची श्रीमंती ओळखण्यापासून हातातील बोटात हिऱ्याऐवजी कांदा दर्शवणाऱ्या अंगठीपर्यंत अनेक विनोद सध्या गाजत आहेत. या विनोदांतून अतिशयोक्ती झळकत असली तरी बदलापूरमधील चोरटय़ांनाही कांद्याचे ‘मूल्य’ लक्षात आले असावे, असे दिसत आहे. त्यामुळेच बदलापूर पश्चिमेकडील गणेशनगरमधील न्यू साई आश्रय इमारतीमधील एक किराणा दुकान फोडून चोरटय़ांनी कांदा व लसूण पळवली.
राजेश पाठक यांच्या दुकानाचे कुलूप तोडून गोणीमध्ये भरून ठेवलेला २२७५ रुपये किमतीचा ७५ किलो कांदा व ३२०० रुपये किमतीची ४० किलो लसूण तसेच दुकानातील ५०० रुपयांची रोख रक्कम असा सुमारे ७०७५ रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. पाठक यांच्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.