15 July 2020

News Flash

भिवंडीत यंत्रमाग व्यवसायाची वीण उसवलेलीच

७५ टक्के यंत्रमाग बंद; कामगार मूळ गावी परतत असल्याने मोठा फटका

७५ टक्के यंत्रमाग बंद; कामगार मूळ गावी परतत असल्याने मोठा फटका

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय पूर्ववत झाल्याचा दावा केला असला तरी या उद्योगाचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर आहे ते कामगार मूळ गावी परतल्याने जवळपास ७५ टक्के कारखाने अजूनही बंद असल्याचे चित्र आहे. शेवटच्या टप्प्यातील ताळेबंदी जाहीर करत असताना राज्य सरकारने भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्यास मात्र परवानगी दिली आहे. हे उद्योग पूर्ण भराने सुरू झाले, असा दावाही सरकारमार्फत केला जात असला तरी परिस्थिती तशी नाही.

दोन महिन्यांपासून बंद असलेले भिवंडीतील यंत्रमाग क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळून या यंत्रमागांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देऊन उद्योग सुरू केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात सरकार मश्गूल असले तरी हा निर्णय घेण्यात खूपच उशीर केला, अशा प्रतिक्रिया यंत्रमाग उद्योगांच्या वर्तुळात उमटत आहेत. भिवंडी शहरात जवळपास ६ लाख यंत्रमाग आहेत. या यंत्रमागावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या चार ते पाच लाख मजूर काम करत असतात. देशात टाळेबंदी लागू होताच या व्यवसायात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात या उद्योगांना परवानगी मिळाले या आशेवर येथील कामगार वर्ग होता. प्रत्यक्षात टाळेबंदी वाढत गेली आणि उद्योगही बंद राहीला. त्यामुळे येथील कामगारांना एक वेळचे जेवण मिळणेही कठीण होऊन बसले. हाती काम नसल्याने हळूहळू छुप्या पद्धतीने अनेक कामगारांनी भिवंडी सोडली. त्यानंतर केंद्र सरकारने श्रमिक रेल्वे चालविल्याने त्याचा आधार घेत अनेक कामगार आपापल्या गावी निघून गेले. सुमारे ६० ते ७० टक्के कामगार हे गावी गेल्याचे येथील उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे आता कामगारच नसल्याने यंत्रमाग सुरू कसे करायचे, असा प्रश्न उद्योजकांपुढे आहे. यंत्रमाग व्यावसायिक आता त्यांच्या कामगारांना पुन्हा कामावर बोलावू लागले आहेत. मात्र, जे कामगार गावी गेलेत ते दोन महिन्यांशिवाय येणार नाहीत, अशी उत्तरे त्यांना मिळत आहेत. तीन लाख कामगार मूळ गावी गेले आहेत. कामगार नसल्याने यंत्रमाग व्यवसाय चालविणे कठीण होणार असल्याचे भिवंडी असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. सुनील चव्हाण यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात सरकारने यंत्रमागाला परवानगी दिलेली आहे. मात्र, हा निर्णय घेण्यास खूप उशीर झालेला आहे. कामगारांच्या तुटवडय़ामुळे सुमारे ७५ टक्के यंत्रमाग व्यवसाय बंद राहण्याची शक्यता आहे.

– पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पद्मानगर पावरलूम विव्हर्स असोसिएशन 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:49 am

Web Title: 75 percent loom closed in bhiwandi zws 70
Next Stories
1 जागेचा शोध संपेना
2 ऑनलाइन मद्यविक्रीत दलालांमार्फत लूट
3 पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा  ‘कचरा’
Just Now!
X