गेल्या आर्थिक वर्षांत ७८ हजार गाडय़ांची खरेदी; उपप्रादेशिक कार्यालयाला विक्रमी महसूल

वसईकरांचा वाहने खरेदी करण्याचा कल वाढला असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ७८ हजार वाहनांची खरेदी वसईकरांनी केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही खरेदी १३ हजाराने वाढली आहे. मागील आर्थिक वर्षांत ६५ हजार वाहने खरेदी केली होती. या विक्रीमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तब्बल २११ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे.

२०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. वसईसह पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील वाहनांची नोंदणी या उपप्रादेशिक कार्यालयातून होत असते. या कार्यालयात ५ लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे. त्यात दरवर्षी भर पडत असते. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांतही वाहने वाढली आहे. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांत या कार्यालयात ७८ हजार ९६ नवीन वाहनांची नोंद झाली. २०१५-१६ या वर्षांत ६५ हजार १०४ वाहनांची नोंद झाली होती. त्यात १३ हजारांनी वाहनांची संख्या वाढली आहे. दिवसाला सरासरी ३०० वाहने रस्त्यावर आली आहेत. सर्वाधिक विक्री मोटारसायकली आणि स्कूटर या वाहनांची झाली आहे.

‘बीएस ३’च्या भीतीने वाहनखरेदीचा उच्चांक

दुचाकी आणि चारचाकी वाहनांतील ‘बीएस ३’ मानक रद्द केल्याने शेवटच्या दिवशी वाहनविक्रेत्यांनी मोठी सवलत देऊ  केली होती. त्यामुळे खरेदी वाढली. ३१ मार्च या शेवटच्या दिवशी १,०५८ एवढय़ा वाहनांची नोंद झाली. त्यासाठी परिवहन कार्यालय उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. एकाच दिवशी सर्वाधिक वाहनांची नोंद झाल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. दररोज सरासरी ३०० वाहनांची नोंद होते. दसरा, गुढीपाडवा आदी दिवशी वाहनांची नोंदी वाढतात.

महसुलात विक्रमी वाढ

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महसूलदेखील वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत १६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षांत २११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाढत्या वाहनांमुळे यापुढे वाहतूक कोंडीचा आणि वाहने उभे करण्याची समस्या अधिक जटील होणार आहे. वसई, पालघर-बोईसर मोठे औद्य्ोगिक क्षेत्र आहे. तिथे मुंबई, ठाणे तसेच गुजरातमधील वाहने येत असतात.