ठाण्याच्या कोपरी परिसरातील बाजारपेठेत बुधवारी संध्याकाळी अजगर शिरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. ठाण्याच्या पश्चिमेला असणारा कोपरी मार्केटचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. संध्याकाळच्या वेळेत तर गर्दीमुळे बाजारातून चालणेही अवघड असते. मात्र, कालची संध्याकाळ त्याला अपवाद ठरली. काल बाजारपेठेत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु असताना अचानकपणे एक अजगर थेट रस्त्यावर प्रकट झाला. विशेष म्हणजे हा अजगर काही लहानसहान नव्हता, त्याची लांबी तब्बल आठ फूट इतकी होती. साहजिकच इतका मोठा अजगर पाहिल्यानंतर बाजारपेठेतील अनेकांची बोबडी वळाली. अजगराला पाहिल्यानंतर लोकांनी लगेचच पळायला सुरूवात केली.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खूप गर्दीही होती. याशिवाय, रस्त्यावरून वाहनांची रहदारीही सुरू होती. त्यामुळे चेंगराचेंगरी किंवा अपघात होण्याची भीती होती. मात्र, या परिसरात ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस चंद्रकांत पवार यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वप्रथम दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली. त्यानंतर त्यांनी सैरावैरा पळणाऱ्या लोकांना शांत केले. या दरम्यान सर्पमित्रांशी देखील संपर्क साधण्यात आला. मात्र, त्याचवेळी एका तरूणाने पुढे येऊन अजगराला पकडण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दरम्यान, काही वेळानंतर या अजगराला पोलिसांच्या मदतीने खाडी परिसरात सोडून देण्यात आले.

मात्र, शहरीकरणामुळे गजबजलेल्या कोपरी परिसरात हा अजगर आलाच कुठून, हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. काहीजण गटारातून हा अजगर मार्केटच्या परिसरात आला असावा, असे सांगत आहेत. मात्र, या निमित्ताने निसर्गावर मानवी अतिक्रमणामुळे वन्यप्राण्यांच्या नष्ट होत चाललेल्या निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.