उकाडय़ामुळे नागरिक हैराण

डोंबिवली :  डोंबिवली पश्चिमेत भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने सकाळी साडेसात वाजल्यापासून गरिबाचापाडा आणि देवीचापाडा या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली असल्याने शहरातील नागरिक घरांमध्येच आहेत. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उकाडय़ामुळे नागरिक अर्धमेले झाल्याची परिस्थिती होती. दुपारी तीन वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गेल्या आठवडय़ाभरापासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून घरांमध्ये असलेले नागरिक थंडाव्यासाठी पंखे आणि वातनुकूलित यंत्रणांचा वापर करत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. अशातच मंगळवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने सकाळी साडेसात वाजल्यापासून गरिबाचापाडा आणि देवीचापाडा या दोन परिसरांचा वीजपुरवठा खंडित झाला. उकाडय़ाच्या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने घरांमध्ये असलेले नागरिक अस्वस्थ झाले. महावितरणच्या कार्यालयातूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. उन्हाचा कडाका सुरू  झाला तरी वीज न आल्याने अनेक रहिवासी सोसायटीच्या आवारात झाडांखाली बसून होते. घरातील लहान मुले, वृद्धांची सर्वाधिक आबाळ झाली.

टाळेबंदी आणि त्यात कर्मचाऱ्यांची वानवा अशा परिस्थितीत रात्रपाळीला असलेले कर्मचारी आणि दिवसपाळीला आलेले कर्मचारी आणि अभियंता यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड आणि त्यांचे इतर साहाय्यक कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, भूमिगत वीजवाहिनीतील बिघाड तात्काळ शोधणे शक्य नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडथळा येत होता. अखेर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभारून दुपारी तीन वाजता या भागांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

गरिबाचापाडा येथील फीडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. भूमिगत वीजवाहिनीतील हा बिघाड आहे. तो दुरुस्त होईपर्यंत गरिबाचापाडा आणि देवीचापाडा परिसराला वीजपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. हा तात्पुरता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर तातडीने भूमिगत वीजवाहिनीतील बिघाड शोधून भूमिगत वीजवाहिनी पूर्ववत करण्यात येईल. त्यानंतर पर्यायी व्यवस्था बंद करून मुख्य वाहिनीतून पुरवठा नियमित केला जाईल.

– धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण, डोंबिवली

घरातून काम करणाऱ्यांचे हाल

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालये बंद असल्याने शहरातील अनेक नागरिक घरातून कार्यालयीन काम करत आहेत. मात्र, वीज नसल्याने  या परिसरातील नागरिकांना काम करणेच अशक्य झाले. परिसरातील इंटरनेट पुरवठाही ठप्प झाल्याने लॅपटॉप सुरू असूनही काम करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे घरातून काम करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.