एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून २५ बँक ग्राहकांच्या खात्यातून तब्बल आठ लाख रुपये लंपास केल्याची घटना कळवा येथे उघडकीस आली आहे. क्लोनिंग केलेल्या कार्डच्या सहाय्याने पुणे, नरीमन पॉइंट, वाशी, कल्याण आदी ठिकाणच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक झाली असून पोलीसही संभ्रमात आहेत.

खात्यातून पैसे काढलेले नसतानाही कळव्यातील आयआयसीआय बँकेच्या  काही खातेदारांना पैसे काढल्याचे संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आले. त्याबाबत सविस्तर चौकशी केली असता या सर्वानी २४ ते ३० जून या कालावधीत ठाण्यातील साकेत येथील आयआयसीआय बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. पोलीस तपासात या एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याचे निदर्शनास आले.

बँकेने केलेल्या चौकशीत हे पैसे क्लोनिंग केलेल्या कार्डच्या सहाय्याने काढल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांवर चोरांनी कार्ड क्लोनिंगसाठी आवश्यक असलेली यंत्रणा बसवली होती. तिथून कार्डचा डेटा मिळवून कार्ड क्लोनिंग केले. त्यानंतर मिळालेल्या पासवर्डच्या आधारे वेगवेगळ्या शहरांतील एटीएम केंद्रांमधून पैसे काढल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. साकेत येथील आयसीआससीआय एटीएम केंद्रांवरील कॅमेऱ्यांचे गेल्या महिन्याभरातले सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, ज्या ठिकाणांहून हे पैसे काढण्यात आले, त्या एटीएम केंद्रांवरील सीसीटीव्ही फूटेजही मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आयटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाला असून ठाणे सायबर पोलीस त्याचा पुढील तपास करत आहेत.

ग्राहकांना पैसे परत मिळण्याची हमी?

कार्डचे क्लोनिंग होत असेल तरी आरबीआयच्या निकषानुसार ही संबंधित बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतली त्रृटी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पैसे काढण्यात आले तर त्याची बँक ग्राहकांना पैसे देईल. त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्रहाकांना त्यांच्या ठेवी पुन्हा मिळतील असे आश्वासन  आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर दिले आहे.

फिनिक्स मॉल परिसरात पालिकेची कारवाई

मुंबई : फिनिक्स मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पालिकेने या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मॉल, हॉटेल यांच्यासमोरील जागा मोकळी ठेवण्याचा नियम असूनही वाढीव, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिग काहूना हॉटेल, स्टार बक्स कॉफी, मोशेज यांच्यावर पालिकेचा हातोडा पडला.

अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मोकळ्या जागा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र अधिकाधिक जागा अडवण्याच्या दृष्टीकोनातून फिनिक्स मॉलमध्ये अनेकांनी वाढीव बांधकाम केली होती. जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी १५ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने फिनिक्स मॉलमधील मोकळ्या जागा अडवणाऱ्या बांधकामे तोडण्याची कारवाई केली.