करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले असून शहापूर तालुक्यात आज आठ रुग्ण वाढल्याने तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. आज दोघांनी करोनावर मात केली असताना तालुकावासीयांना दिलासा मिळाला होता मात्र आज एकाचवेळी करोना बाधित आठ रुग्ण आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

शहापूर तालुक्यात वासींद, शहापूर, अल्याणी, कसारा, शेलवली (बां) आदी ठिकाणी २४ रुग्ण आढळून आले असून आज शेलवली (बां) – ५ , वासिंद  १ ,  शहापूर १ व धसई १ असे आठ रुग्ण आढळून आले आहेत. दोन महिला व सहा पुरुष असून यात एका डॉक्टरचा समावेश आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कडक लॉकडाउन पाळण्यात येणार असून मेडिकल्स व दवाखाने वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे.