ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत जाताना दिसत आहे. गुरुवारी शहरातील ८२ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील रुग्णसंख्येने आतापर्यंत ५४१ हा आकडा गाठला असल्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसमोरची चिंता वाढत जात आहे. शहरात आतापर्यंत १८ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत ही शहरातील रुग्णसंख्येत एका दिवसातली सर्वाधिक वाढ असल्याचं बोललं जातंय.

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोनाची लागण झाल्याची प्रकरणं पुढे येत आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवेसाठी अनेक नागरिक मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात, त्यामुळे दिवसेंदिवस बदलापूर-अंबरनाथ शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला २२८ रुग्णांवर उपचार सुरु असून ११० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. अद्याप १८७ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान अंबरनाथ शेजारील बदलापूर शहरात गुरुवारी २६ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.