सदोष वीज मीटरमुळे यापूर्वीच त्रासात असलेल्या बदलापूरच्या महावितरणाच्या ग्राहकांना आता मीटर युनिट घेण्याच्या सदोष यंत्रणेचाही फटका बसतो आहे. त्यामुळेच बदलापुरातील एका ग्राहकाला तब्बल ८२ हजारांचे बिल देण्यात आले आहे. त्यांच्यासारख्याच असंख्य ग्राहकांनी अवाच्या सव्वा बिलामुळे महावितरणाच्या कार्यालयात गर्दी केल्याचे चित्र सध्या बदलापुरात पाहायला मिळते आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असून त्यातून दिलासाही मिळण्यास उशीर लागत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.

महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये वीज ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातल्या महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातच आता मीटरचे युनिट घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे वीज ग्राहकांच्या त्रासात नव्याने भर पडते आहे. त्यामुळे बदलापुरातील एका वीज ग्राहकाला तब्बल ८२ हजारांचे महिन्याचे बिल पाठवण्यात आले आहे. बदलापूर पश्चिमेतील जाधव कॉलनी भागात राहणाऱ्या निलिमा चिंदरकर यांना हे ८२ हजारांचे बिल आले असून सरासरी दोन हजार बिलाची सवय असल्याने इतके बिल आल्याने त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी महावितरणाच्या अभियंत्यांना विचारले असता, त्यांनी काही मिनिटात ८२ हजारांचे ४० हजारांत रूपांतर करून नवे बिल दिले खरे, मात्र घरगुती वापरात महिन्याला तब्बल ५६९३ युनिट कसे खर्च होऊ  शकतात, असा सवाल चिंदरकर यांनी उपस्थित केला आहे. यात महावितरणाची चूक असतानाही अशा तक्रारक्रारींमध्ये ग्राहकांनाच प्रति तक्रार १८० रुपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे. असे अवाच्या सव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

दरम्यान, अशा बिलांबाबत अधिक माहिती घेतली असता मीटर युनिट तपासण्यास जाणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यात निष्Rि यता दाखवल्याची बाब समोर आली आहे.