कला शाखेच्या उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली

बारावी परीक्षेच्या निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून ठाणे जिल्ह्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या ८६.४६ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक, ८७.८७ टक्के इतका लागला असून, कला शाखेच्या निकालाची टक्केवारी (७९.६५%) मात्र यंदा घसरली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १५०५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड या भागातील निकालाची टक्केवारी जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नवी मुंबई आणि मिरा भाईंदरसह ठाणे आणि पालघर पट्टय़ातून यंदा बारावीच्या परीक्षेस ८४६०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७३१४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.०४टक्के इतके असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.२९ टक्के इतकी आहे. या वर्षी वाणिज्य शाखेत ४३८१० विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ३८४९८ (८७.८७ टक्के)विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत २४५९० विद्यार्थ्यांपैकी २१६३९ (८८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेच्या निकालाची टक्केवारी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा घसरली असून १५१८० विद्यार्थ्यांपैकी १२०९१(७९.६५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले आहेत.

कल्याण डोंबिवली परिसरात १८८०४ विद्यार्थ्यांपैकी १५८१७ (८४.१२ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर परिसरात सर्वाधिक ८९.४४ टक्के इतक्या निकालाची नोंद झाली आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी यासारख्या ग्रामीण भागातही निकालाची टक्केवारी ९०टक्क्यांच्या आसपास आहे.

कमी वाचनामुळे कला शाखेची अधोगती

कला शाखेतील विद्यार्थ्यांना वाचनाची नितांत गरज असते; परंतु वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम गुणांवर दिसून येतो. मराठी माध्यमाची मुले अकरावीमध्ये इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात, मात्र बोर्डाने परवानगी दिल्याप्रमाणे मराठीमध्ये परीक्षा देतात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये शिकवण्यात येणारे इंग्रजी माध्यमातील पाठय़पुस्तकांचे वाचन न करता बाहेरून पुस्तके विकत घेऊन अभ्यास करतात. यामुळे कला शाखेचा निकाल कमी लागला असा अंदाज आहे, असे विश्लेषण जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य गौरी तिरमारे यांनी केले.