१७८ जणांचा मृत्यू, ४१६ जण गंभीर जखमी

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात या वर्षी १७८ जणांना रस्त्ये अपघातात आपला जीव गमवावा लागला. तर, ४१६ जण गंभीर जखमी झाले. जिल्ह्य़ात १०८ अपघाती क्षेत्र असून यातील २० हून अधिक अपघाती क्षेत्र ठाणे आणि भिवंडी शहरात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघातांच्या आकडय़ांमध्ये घट झाल्याचा दावा ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी केला आहे. या अपघातांची सरासरी काढल्यास जिल्ह्य़ात दररोज दोन अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. तर, प्रत्येक दोन ते तीन दिवसांत एका व्यक्तीला रस्ते अपघातात मृत्यू येत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ८५५ अपघात घडले. यात १७८ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, ४१६ जण गंभीर

जखमी झाले. तसेच २६१ जण किरकोळ जखमी झाले. तर, २०१८ मध्ये याच कालावधीत १ हजार २२ अपघात घडले. यात २१५ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ५०२ जण गंभीर जखमी तसेच ३०५ जण किरकोळ जखमी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघातांमध्ये प्रंचड घट झाल्याची माहिती उपायुक्त अमित काळे यांनी दिली. मात्र, या अपघातांची सरासरी काढल्यास जिल्ह्य़ात दररोज दोन अपघात घडत होते.

अपघाती क्षेत्र

जिल्ह्य़ात १०८ अपघाती क्षेत्र आहेत. यातील ठाणे आणि भिवंडी शहारात २० हून अधिक अपघाती क्षेत्र आहेत. यात भिवंडी येथे मानकोली नाका, अंजूर फाटा, दिवा गाव, कशेळी ब्रिज, ओवळी खिंड, पिंपळास फाटा, राजनोली यांचा सामावेश आहे. ठाणे शहरात घोडबंदर येथील बह्मांड सिग्नल, पातलीपाडा, माजिवडा उड्डाणपुल, आर मॉल, गायमुख, ओवळा या भागाचा तसेच कोपरी येथील कोपरी पूल, आनंदनगर चेकनाका यांचा सामावेश आहे. तर, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय यांचा सामावेश आहे.