सध्या ८.४२ टक्के उपचाराधीन रुग्ण; मृत्युदर २.५३ टक्के

ठाणे : एकीकडे जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले असतानाच दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९१ हजार ८२५ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ८९.०४ टक्के म्हणजेच १ लाख ७० हजार ८१९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर सध्या ८.४२ टक्के म्हणजेच १६ हजार १६० इतके रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरचा भारही काहीसा कमी होऊ लागल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यात दररोज १ हजार ५०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारल्यामुळे करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. त्यामुळे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जिल्ह्यतील आतापर्यंत १ लाख ९१ हजार ८२५ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ लाख ७० हजार ८१९ बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८९.०४ टक्के आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार १६० आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८.४२ टक्के आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या.

शहरनिहाय करोनामुक्त रुग्ण

शहर                     करोनामुक्त     उपचाराधीन

कल्याण-डोंबिवली       ४१८३२                ३४५०

ठाणे                            ३६१५२                ३६४३

नवी मुंबई                   ३६१३९                ३३८९

मीरा-भाईंदर               १८१७९                १५७५

ठाणे ग्रामीण                १२६६२               २३५३

उल्हासनगर                 ८७१४                  ६०९

बदलापूर                       ६३२७                   ३०१

अंबरनाथ                      ६०५३                   ४६४

भिवंडी                             ४७५९                 ३७६

 

मृत्युदर कमी

जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून त्याचबरोबर मृत्युदरही कमी करण्यात मदत होत आहे. आतापर्यंत ४ हजार ८४६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २.५३ टक्के आहे.