वसई महापालिकेतील स्वतंत्र गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या नऊ नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनी बाजू मांडण्यासाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे या गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या स्वतंत्र गटातील नगरसेवक ठाम असून कायदेशीर बाजू मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकत बहुमताने सत्ता स्थापन केली होती. बहुजन विकास आघाडीकडे १०७, शिवसेना ५, भाजप १ आणि अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल त्या वेळी होते. त्या वेळी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार होते. परंतु अचानक सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतून नऊ नगरेसवकांनी बाहेर पडून आपला स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्याला वसई-विरार शहर विकास आघाडी असे नाव देण्यात आले होते. या गटाने सगळ्यात मोठा गट असल्याचा दावा करून विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला होता. या गटात महेश पाटील, माया चौधरी, अतुल साळुंखे, सदानंद पाटील, विनय पाटील, रिटा सरवय्या, प्रशांत राऊत आणि सखाराम महाडिक या नगरसेवकांचा समावेश होता. मात्र विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाऊ नये यासाठी बहुजन विकास आघाडीने केलेली ही राजकीय खेळी असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. पक्षफुटीला २००६च्या कायद्यानुसार बंदी असून त्यामुळे त्यांचे पद रद्द होऊ शकते. या मुद्दय़ाचा आधार घेत शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी या गटाच्या अस्तित्वालाच आव्हान देत कोकण विभागीय आयुक्तांकडे दावा ठोकला होता. या गटाची मान्यता रद्द करा, नगरसेवकांचे पद रद्द करा, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या

त्यावर आयुक्तांनी या सर्व नऊ नगरसेवकांना नोटिसा बजावून आपली बाजू मांडण्यासाठी १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची बाजू ऐकल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या स्वतंत्र नगरसेवकांच्या गटाने आपली बाजू भक्कम असल्याचे सांगितले आहे. आम्ही पक्ष सोडला नसून पक्षाने काढले असल्याचे या गटाचे नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले. आम्ही आजही पालिकेच्या महासभेत स्वतंत्र बसतो असेही ते म्हणाले. आम्ही आमची बाजू कोकण आयुक्तांपुढे मांडून आमच्या गटाचे अस्तित्व सिद्ध करून दाखवू, असेही ते म्हणाले.