२५ एप्रिलपर्यंत रंगीत छायाचित्र जमा करा, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळणार

अचूक आणि परिपूर्ण अशा मतदारयाद्या तयार व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेत ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतील तब्बल नऊ लाख मतदारांची छायाचित्रे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून २५ एप्रिलपर्यंत या मतदारांनी रंगीत छायाचित्रे जमा केली नाहीत तर ही नावे यादीतून वगळली जातील, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.

मतदार यादीत छायाचित्र नसल्यास असे मतदार स्थलांतरित म्हणून गणले जाऊन अशांची नावे यादीतून वगळण्याची कायदेशीर कारवाई केली जाते. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या फेरतपासणी मोहिमेत जिल्ह्य़ातील नऊ लाख मतदारांची छायाचित्र उपलब्ध होत नसल्याने २५ एप्रिलनंतर ही नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या नऊ लाख नावांपैकी बरीचशी नावे बोगस अथवा दुबार असण्याची शक्यता वर्तविली जात असून ही मोहीम पूर्ण झाल्यानंतरच यासंबंधी ठोस निष्कर्ष काढता येईल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

छायाचित्र नसल्यास नावे वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सातत्याने सुरू असून २०१७ या वर्षांत ठाणे जिल्ह्य़ातील ४५ हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्य़ातील कल्याण, दिवा, मुंब्रा, ऐरोली, बेलापूर या विधानसभा मतदारसंघात रंगीत अथवा कृष्णधवल अशी दोन्ही छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या मोठी असून नागरिकांनी मतदारयादीतील नावे, छायाचित्रांची तपासणी करण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. यापूर्वी काही मतदारांची कृष्णधवल छायाचित्र निवडणूक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, नव्या नियमानुसार मतदारांचे रंगीत छायाचित्र आवश्यक असून कृष्णधवल स्वरूपातील छायाचित्र ग्राह्य़ धरले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. रंगीत छायाचित्रांची पूर्तता केल्यावर मतदारांना निवडणूक स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शहरी भाग मोठय़ा प्रमाणात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघात एकूण  ६० लाख एवढी मतदारांची संख्या आहे. निवडणुकांपूर्वी महापालिका अधिकारी, बुथ अधिकारी यांना मतदार तपासणीसाठी घरोघरी जाणे शक्य नसते. अनेकदा मोठय़ा गृहसंकुलात मतदार तपासणीसाठी गेल्यावर प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया अपूर्ण राहते. या पाश्र्वभूमीवर नाव, छायाचित्र, पत्ता नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम निवडणूक कार्यालयातून सातत्याने होत असते. २०१५ या वर्षांत मुंब्रा, दिवा, कोपरी, पाचपाखाडी, बेलापूर येथील ५ लाख ५२ हजार मतदारांचे छायाचित्र नसल्याने यादीतून नाव वगळण्यात आले होते. २०१७ या वर्षांत छायाचित्र आणि नावे नसलेल्या ४५ हजार मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत, तसेच याच वर्षांत ५० हजार मतदारांची नवीन नोंदणी करण्यात आली होती. ग्राह्य़ नसलेल्या मतदारांची नावे यादीतून सातत्याने वगळण्यात येत असली तरी नवीन मतदारांची नोंदणी होत असते. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या कमी होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तरुणांची संख्या अधिक

कल्याण आणि ठाणे शहरातून नागरिक मोठय़ा प्रमाणात स्थलांतर करत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. छायाचित्र नसलेल्या मतदारांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून वेगवेगळ्या महाविद्यालयात निवडणुकांपूर्वी जागृती मोहीम राबवण्यात आली असली तरी तरुणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तरुणांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी १ जानेवारी २०१९ पूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना येत्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे.

यादी तपासण्याचे आवाहन

ठाणे जिल्ह्य़ानंतर पुणे, मुंबई उपनगर या ठिकाणी छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांवेळी जिल्ह्य़ात एकूण ४ लाख ५० हजार मतदारांची छायाचित्रे नव्हती. त्या वेळी मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली नव्हती. मात्र आता छायाचित्र तसेच रंगीत छायाचित्र नसलेली नावे वगळण्यात येणार असून नागरिकांनी यादीतील नावे, छायाचित्र तपासण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी केले आहे.