महाराष्ट्र सागरीकिनारा प्राधिकरणाची मंजुरी

कळवा-खारेगाव खाडीकिनारी असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करत येथील चौपाटीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या ठाणे महापालिकेने मुंब्रा बाह्यवळण रस्त्यापासून खारेगाव टोलनाक्यापर्यंत असलेला अत्यंत वर्दळीचा रस्ता रुंद करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बाह्यवळण रस्त्यापासून खारेगाव टोलनाक्यापर्यंत असलेल्या अरुंद रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व त्याचा कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीवर होणारा परिणाम पाहून ठाणे महापालिकेने मुंब्रा वळण रस्ता ते रेती बंदर विसर्जन घाटापर्यंतच्या रस्त्य़ाचे रुंदीकरण तसेच नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याची उभारणी सुरू केली आहे. महाराष्ट्र सागरी किनारा प्राधिकरणाने महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे.

मुंब्रा शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला मुंब्रा बाह्यवळण रस्त्याची पुरेशा देखभाल-दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. असे असले तरी उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून दररोज शेकडोंच्या संख्येने अवजड वाहने या रस्त्यावरून आजही भिवंडीच्या दिशेने ये-जा करीत असतात. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खारेगाव टोलनाक्यापर्यंत खाडीकिनारी असलेला अरुंद महामार्गामुळे मोठय़ा संख्येने वाहने याच भागात अडकून पडतात. या कोंडीचा भार तळोजा-मुंब्रा आणि पर्यायाने कल्याण-शीळ मार्गावरील वाहतुकीवर पडत असतो. त्यामुळे आठवडय़ातून किमान एकदा तरी कल्याण-डोंबिवली-शीळ-महापे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. या कोंडीमुळे ठाणे, कळव्यातून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणारी वाहने महापे-शीळमार्गे ये-जा करतात. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर या वाहनांचा भार वाढतो असा अनुभव आहे. तसेच कळवा-मुंब्रा या मार्गावर वाहतूक करणारी हलकी वाहने अवजड वाहनांच्या गर्दीत अडकून पडतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन शीळ-मुंब्रा आणि पुढे मुंब्रा वळणरस्ता ते खारेगाव टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी एकीकडे प्रकल्पांची आखणी केली जात असताना ठाणे महापालिकेने मुंब्रा रेती बंदर ते बाह्यवळण रस्त्यापर्यंत तब्बल दीड किलोमीटर अंतरावर नऊ मीटर रुंदीचा नवा सेवा रस्ता उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

पर्यावरण मंजुरीपूर्वीच काम?

या प्रकल्पासाठी सागरी नियमन प्राधिकरणाने ३० जून रोजी मंजुरी दिल्याने रस्तेबांधणीतील मोठा अडथळा दूर झाला असला तरी त्यापूर्वीच हे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली. या रस्त्याच्या उभारणीसाठी खडीकामही पूर्ण करण्यात आले असून पावसाळ्यानंतर हे काम पूर्ण होणार आहे. पर्यावरण मंजुरीपूर्वी काम कसे सुरू करण्यात आले याविषयी आपणास माहिती नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी नगर अभियंता रतन अवसोरमल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.