तीन दिवस उलटूनही चाचणी नाही

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : करोनाचा फैलाव बळावू नये, यासाठी सामाजिक दुरीकरणावर भर दिला जात असताना वसई-विरार शहर महापालिकेने अलगीकरणासाठी नेल्या जाणाऱ्या नऊ जणांना चक्क एकाच रुग्णवाहिकेत दाटीवाटीने बसवून सामाजिक अंतराचेच तीनतेरा वाजवले आहेत. इतकेच नव्हे तर अलगीकरण करून तीन दिवस उलटूनही संबंधितांना करोना चाचणीकरिता ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे करोनासारख्या आपत्तीच्या काळातही पालिकेचा नेहमीचा ढिसाळपणा चव्हाटय़ावर आला आहे.

वसईच्या पूर्वेकडील कामण येथील एका कुटुंबातील एक व्यक्ती शुक्रवारी करोना संशयित आढळल्याने वसई-विरार शहर महापालिकेने या संपूर्ण कुटुंबाला अलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कुटुंबाला शनिवारी कपडे आणि अन्य आवश्यक सामग्रीसह सकाळी १० वाजता तयार राहण्यास सांगण्यात आले. प्रत्यक्षात पालिकेचे अधिकारी संध्याकाळी ५ वाजता आले. यात ७ ते ८ अधिकारी आणि तीन पोलीस शिपाई यांचा समावेश होता. त्यानंतर या कुटुंबाला दोन वेगवेगळ्या रुग्णवाहिकांतून घेऊन जाणे अपेक्षित असताना कुटुंबातील ९ जणांना एकाच रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले. यात कुटुंबप्रमुख दाम्पत्यासह त्यांच्या दोन सुना, एक मुलगा आणि चार नातवंडे यांचा समावेश होता. सध्या या कुटुंबातील करोना संशयित रुग्ण नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुग्णालयात दाखल असून उर्वरित कुटुंब वसई येथील ‘रॉयल गार्डन’ हॉटेलच्या अलगीकरण केंद्रात आहे.

दरम्यान, अलगीकरण केंद्रात आणून तीन दिवस झाले तरी आपली चाचणी केली नसल्याची तक्रार कुटुंबप्रमुखाने केली आहे. महापालिकेने एका रुग्णवाहिकेत ९ जणाना कोंबून सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ फासतानाच अलगीकरण केंद्रात ताटकळत ठेवून मानसिक ताप दिल्याने हे कुटुंब याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी कामण येथे बाजार बंद करण्यास पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आले असता ते आपल्या संपर्कात आले होते, असा खळबळजनक खुलासाही कुटुंबप्रमुखाने केला आहे. दरम्यान अलगीकरण केंद्रात आणलेल्या कुटुंबाची करोना चाचणी कधी करणार? याबाबत माहिती घेण्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी तब्बसूम काझी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचा संदेश आला.

एका रुग्णवाहिकेत किती माणसे बसवावीत, हा निर्णय डॉक्टर घेत असतात. आमचे काम प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आणि त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे हे आहे.

– सुरेंद्र पाटील, प्रभारी साहाय्यक अधिकारी, प्रभाग-जी

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण केल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांची चाचणी केली जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीला अन्य काही आजार असल्यास आपण त्यांची चाचणी त्वरित करतो.

– डॉ. स्मिता वाघमारे, वैद्यकीय अधिकारी