सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांची टीका

ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याची बोंब होत असतानाच, आता महापालिका शाळांमध्ये ९१ शिक्षकांची कमतरता असल्याची बाब सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आली. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करत शाळांमध्ये पुरेसे शिक्षक देण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

ठाणे महापालिका शाळेच्या अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक शाळांतील स्वच्छतागृहांमधून दुर्गंधी येते. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे बाक नाहीत तर काही ठिकाणी बाक तुटलेले आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. या प्राथमिक सुविधांची बोंब असतानाच शिक्षण विभागाकडून मात्र वेगळेच नवनवीन प्रस्ताव मांडले जात आहेत. प्राथमिक सुविधा पुरविण्यावर भर देण्याऐवजी अन्य प्रस्ताव तयार केले जात असून त्यामुळेच हे सर्वच प्रस्ताव वादग्रस्त ठरू लागले आहेत. या प्रस्तावावरून शिक्षण विभागावर टीका होत आहे. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याच मुद्दय़ावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. वाघबीळ भागातील महापालिका शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याची बाब शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून त्या ठिकाणी जास्त शिक्षक असल्याचा दावा शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक यांनी केला. तसेच येऊर येथील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असतानाही त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर महापालिका शाळेमध्ये किती शिक्षक कमी आहेत, याची विचारणा सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर महापालिका शाळेत एकूण ९१ शिक्षकांची कमतरता असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा  परिषद शिक्षण विभागाकडे अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी केली असून त्यांच्याकडून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील, असा दावा शिक्षण विभागाने या वेळी केला.  मात्र, त्यांच्याकडून शिक्षकच उपलब्ध झाले नाही तर तासिका मानधनावर शिक्षक घेण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या वेळी केली.

पालिका शाळेतील शिक्षकांचे ‘गणित’

’ ठाणे महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागांत एकूण दीडशे शाळा चालविण्यात येत असून त्यामध्ये ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

’ या शाळांमध्ये सद्य:स्थितीत ९०० शिक्षक असले तरी विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता आहे. मराठी माध्यमाचे ५६, उर्दू माध्यमाचे २५ आणि हिंदी माध्यमाचे १० अशी एकूण ९१ शिक्षक पदे रिक्त आहेत.

’ गेल्या दोन महिन्यांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले असून काही शिक्षकांना मुख्याध्यापकपदाची पदोन्नती मिळाली आहे.