14 December 2019

News Flash

वसईत ९३ कुपोषित बालके

 एप्रिल २०१९ पासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडय़ांतर्फे केले जाते

शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या; उपाययोजनांसाठी धावपळ

प्रसेनजीत इंगळे, वसई

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या गंभीर होत असून वसई तालुक्यात ९३ कुपोषित बालकांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून उपयायोजनांसाठी धावपळ सुरू केली आहे. यातील अतिकुपोषित बालकांवर उपचार सुरू आहेत.

एप्रिल २०१९ पासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडय़ांतर्फे केले जाते. यात ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी करून कुपोषणाची वर्गवारी केली जाते. यात मध्यम कुपोषित, मॅम आणि अति कुपोषित अशी वर्गवारी केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार बालविकास प्रकल्प वसई १ मध्ये एक बालक अतिकुपोषित असून ३२ बालके मध्यम कुपोषित आहेत. तर प्रकल्प वसई २ मध्ये सात बालके अतिकुपोषित तर ५३ बालके मध्यम कुपोषित वर्गात येत आहेत. त्यांची दैनदिन तपासणी आणि उपचार सुरू असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे यांनी दिली आहे. सध्या वसईत मोठय़ा प्रमाणात परराज्यातून स्थलांतर होत आहे. हे स्थलांतरण मुख्यत: गरीब वस्त्या, झोपडपट्टी विभागात होते. यामुळे या मुलांची संख्याही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांकासून अशा मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी गरम ताजा आहार, जीवनसत्त्वांचे औषध, धान्य दिले जात आहे. तसेच या मुलांची नियमित तपासणीही सुरू आहे. यामुळे लवकरच कुपोषणाला आळा घातला जाईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरी भागातील वाढत्या कुपोषणाबद्दल चिंता

पालघर जिल्हा कुपोषणग्रस्त बालकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाच्या उच्चाटनासाठी प्रशासनाने तसेच सेवाभावी संस्थांनी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांमुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या कमी होऊ  लागली होती. मार्च २०१९ मध्ये फक्त १५५ अतितीव्र तर १६८४ मध्यम कुपोषित बालके  असल्याचे आढळून आली होती. मात्र आता शहरी भागातील कुपोषित बालकांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

वसईत कुपोषणाचा आकडा वाढणे ही चिंताजनक बाब आहे, मुलांना चौकस आहार मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद कुपोषित बालकांकडे लक्ष देते, पण बाळ आईच्या गर्भात असताना तिला सकस आहार मिळाला पाहिजे. त्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही.

– विवेक पंडित, संस्थापक श्रमजीवी संघटना

कुपोषित बालकांची संख्या रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ताजा आहार, औषधे, धान्य दिले जात आहे. या मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू आहे. वसईत मोठय़ा प्रमाणत परराज्यातून स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर गरीब वस्त्या, झोपडपट्टी विभागात होते. यामुळे या मुलांची संख्याही अधिक आहे.  

– धनश्री साळुंखे, प्रकल्प  अधिकारी

तर कुपोषणाचे प्रमाण नियंत्रित

पालघर जिल्ह्यात कुपोषण नियंत्रण योजना ग्रामीण भागांसह शहरी भागात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवडय़ातून पाच दिवस अंडी वा केळी याचा आहार जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येत असून त्यापैकी एका दिवसाचा आहाराचा खर्च जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येतो. राज्यातील इतर भागात फक्त तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) राबवण्यात येते. मात्र पालघर जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांसह मध्यम कुपोषित बालकांना या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये सहभागी करून घेण्याची विशेष अनुमती घेतल्यामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रित केले जाईल, असे प्रशासनातर्फे  सांगण्यात आले.

First Published on November 21, 2019 3:23 am

Web Title: 93 malnourished children in vasai taluka zws 70
Just Now!
X