किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेली टाळेबंदी आणि त्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणाच्या काळात रस्त्यावर चोखपणे बंदोबस्ताचे काम पार पडणारे ठाणे पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत आयुक्तालयातील १ हजार ६८५ पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १ हजार ६११ म्हणजेच ९५ टक्के पोलीस कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत, तर उर्वरित ४६ पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध पोलीस ठाण्यात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २६ जणांचा करोनामुळे तर दोन जणांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच करोनामुक्त झालेले १ हजार ३१ पोलीस कर्मचारी पुन्हा सेवेतही रुजू झाले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ ही शहरे येतात. आयुक्तालयामध्ये सुमारे आठ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. शहरात पोलिसांकडून गस्त घातली जात होती आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना समज दिली जात होती. तर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सण-उत्सव बंदोबस्त, शहरातील वाहतूक नियोजन आणि मुखपट्टय़ांविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे टाळेबंदी आणि टाळेबंदी शिथिलीकरणानंतरच्या कामांमुळे अनेक पोलीस करोनाबाधित झाले. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत १७६ पोलीस अधिकारी आणि १ हजार ५०९ पोलीस कर्मचारी असे एकूण १ हजार ६८५ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक २३५ करोनाबाधित हे मुख्यालयातील होते. त्यापाठोपाठ राज्य राखीव पोलीस दलातील १३० आणि वाहतूक पोलीस विभागातील ११५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांचे करोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील व्यवस्थेवरही त्याचा परिणाम जाणवू लागत होता. १ हजार ६८५ करोनाबाधित पोलिसांपैकी १ हजार ६११ पोलीस करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० टक्के आहे. त्यामध्ये १६८ पोलीस अधिकारी आणि १ हजार ४४३ पोलीस कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ३१ पोलीस पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.